Home Breaking News Akola खदानमधील पाच सराईत गुन्हेगारांची टोळी पाच जिल्ह्यांतून वर्षभरासाठी हद्दपार!

Akola खदानमधील पाच सराईत गुन्हेगारांची टोळी पाच जिल्ह्यांतून वर्षभरासाठी हद्दपार!

 

Akola पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची मोठी प्रतिबंधात्मक कारवाई; अकोल्यासह अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत प्रवेशबंदी

श्रीकांत पाचकवडे

अकोला : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेल्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये एक वर्षासाठी पाच जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला.

Akola

हद्दपार करण्यात आलेल्या टोळीमध्ये शुभम संजय शेळके (वय २०, टोळीप्रमुख, रा. गायत्री नगर, हिंगणा फाटा, अकोला), कबीर सुनील बलखंडे (वय २०), ओम सागर इंगळे (वय १८), अजय मधुकर सावळे (वय १८) आणि प्रद्युम्न दिनेश विरघट (वय १९) यांचा समावेश आहे. यापैकी दुसऱ्या ते चौथ्या क्रमांकाचे सदस्य न्यू खेतान नगर, कौलखेड परिसरातील, तर पाचवा सदस्य श्रद्धानगर, कौलखेड येथील रहिवासी आहे.

 

खून करण्याचा प्रयत्न, दंगल आणि शस्त्रांचा वापर

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील सदस्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रांनी दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, प्राणघातक शस्त्रांसह दंगा करणे, गुन्हेगारी कट रचणे, बेकायदेशीररीत्या अडवून ठेवणे आणि धाकदपटशा करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

 

टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी संबंधित पाचही जणांना अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.

एमपीडीए, मकोका कारवाईचा इशारा

 

दरम्यान, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईला न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात येत आहे. अशा गुन्हेगारांविरुद्ध आगामी काळात एमपीडीए, मकोका, पीआयटी एनडीपीएस, हद्दपारी तसेच इतर प्रचलित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे.

 

सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची मोहीम

 

आगामी धार्मिक सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक शांतता आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अकोला पोलीस दलाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून अशा प्रकारच्या कठोर कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

Don`t copy text!