Home Breaking News दिव्यांगांसाठी राखीव एक टक्के निधीचा प्रभावी विनियोग करा – जिल्हाधिकारी वर्षा मीना...

दिव्यांगांसाठी राखीव एक टक्के निधीचा प्रभावी विनियोग करा – जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे निर्देश

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास साधून त्यांना स्वावलंबी, सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी राखीव असलेल्या एक टक्के निधीचा परिणामकारक विनियोग व्हावा. यासाठी विविध कल्याणकारी योजनांची पारदर्शकपणे व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले.

 

दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव निधीच्या विनियोगाकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीमती मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तुषार जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

 

या बैठकीत दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव एक टक्के निधीच्या विनियोगासंदर्भातील शासन निर्णयातील तरतुदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा आणि आवश्यकता लक्षात घेऊन विविध कल्याणकारी योजनांची निवड करण्यावर भर देण्यात यावा. विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ई-बाईक व ई-वाहन अनुदान योजना तसेच इतर प्रस्तावित योजनांची निवड करण्याबाबत चर्चा झाली.

 

प्रत्येक योजनेची उद्दिष्टे, पात्रता निकष, लाभाचे स्वरूप आणि अनुदानाची मर्यादा निश्चित करणे, योजनानिहाय आर्थिक तरतूद व उपलब्ध निधीचे नियोजन ठरविणे, तसेच लाभार्थी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना अंतिम करण्यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर यावेळी विचारमंथन करण्यात आले.

 

दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव एक टक्के निधीच्या विनियोगासाठी विविध योजनांची निवड व अंमलबजावणी जिल्ह्यात यशस्वीरित्या करण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून 5 नोव्हेंबर 2026 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यात नमूद तरतूदीनुसार जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.

Don`t copy text!