Home Breaking News ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करा; शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा!...

ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करा; शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा! : आमदार रणधीर सावरकर 

 

अकोला तालुक्याची एकात्मिक आरोग्य वर्धिनी आढावा बैठक

श्रीकांत पाचकवडे

अकोला : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासोबतच शासनाच्या विविध आरोग्य व कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अकोला तालुक्याची एकात्मिक आरोग्य वर्धिनी आढावा बैठक आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

 

या बैठकीत ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे कामकाज, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि प्रशासकीय अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

यावेळी बोलताना आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ शेतकरी, शेतमजूर, वंचित, पीडित आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अधिकारी आणि डॉक्टरांनी केवळ प्रशासकीय कर्तव्य म्हणून नव्हे, तर सेवाभावनेतून काम करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

 

दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याचे निर्देश

 

सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रलंबित प्रस्ताव, प्रशासकीय अडचणी आणि शासन स्तरावर आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, तहसीलदार कुणाल झाल्टे, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूराव पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सायली कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता मृणालि ढंगारे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल, गटशिक्षणाधिकारी वर्षा कल्याणकर, सीडीपीओ वैशाली सांगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

आरोग्य विभागासोबतच वीज वितरण, महसूल, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज आमदार सावरकर यांनी अधोरेखित केली.

Don`t copy text!