Home Breaking News न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या कामाला गती; जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करण्याचे...

न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या कामाला गती; जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करण्याचे आमदार रणधीर सावरकरांचे प्रयत्न

रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी; रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

श्रीकांत पाचकवडे

अकोला : विकासकामांवर होणाऱ्या टीका-टिप्पण्यांकडे दुर्लक्ष करत मतदारांना दिलेला शब्द आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी जपण्याच्या भूमिकेतून आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला शहरासह जिल्ह्याच्या विकासकामांना गती दिली आहे. सत्तेचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी करण्याच्या भूमिकेतून ते सातत्याने कार्यरत आहेत. याचाच प्रत्यय न्यू तापडिया नगर येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाच्या कामाच्या पाहणीदरम्यान आला.

 

माजी केंद्रीय मंत्री संजयभाऊ धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा आणि लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या विकासाभिमुख कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामांना गती दिली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचे काम जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण करून हा पूल नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार रणधीर सावरकर यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी रेल्वे विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

पाच गाळ्यांचे काम युद्धपातळीवर

 

उड्डाणपुलाला जोडणाऱ्या पाच गाळ्यांचे काम सध्या सुरू आहे. यापैकी दोन गाळ्यांचे काम रेल्वे विभागाकडून सुरू असून गर्डर टाकणे आणि वेल्डिंगची कामे प्रगतिपथावर आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उर्वरित तीन गाळ्यांचे काम सुरू आहे. या सर्व कामांची आमदार सावरकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

 

यावेळी रेल्वे विभागाचे अधिकारी रायबोले, इलेक्ट्रिकल विभागाचे अभियंता गावंडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेश राठोड यांना कामातील अडचणी दूर करून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. कंत्राटदारासह दोन्ही विभागांनी समन्वयाने काम पूर्ण करावे आणि निर्धारित वेळेत उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देश आमदार सावरकर यांनी दिले.

 

यावेळी महापौर शारदाताई खेडकर, विजय अग्रवाल, जयंत मसने, अॅड. देवाशिष काकड, रणजीत खेडकर, पवन महाले, बाळू जगताप, उमेश श्रीवास्तव, सिद्धार्थ पर्वत, सागर शेगोकार, बाळू सोनवणे, नितीन ताकवले, शशिकला काळे, हरीश काळे, करण साहू, संदीप गावंडे, प्रशांत जोशी, नीतू जगताप, विद्याधर काकड, तुषार भिरड, गणेश अंधारे, माधव मानकर, प्रशांत अवचार, देवानंद टाले, जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

 

जानेवारीच्या अखेरच्या आठवड्याची मुदत पाळण्याचे आव्हान

 

न्यू तापडिया नगर उड्डाणपूल हा शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या पुलाचे काम वेळेत पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. आता आमदार सावरकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिल्याने जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात पूल सुरू करण्याचे आश्वासन प्रत्यक्षात उतरणार का, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!