Home Breaking News अकोलेकरांसाठी खुशखबर! पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस आता अकोल्यात थांबणार! ...

अकोलेकरांसाठी खुशखबर! पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस आता अकोल्यात थांबणार! खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश

पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी, २८ नोव्हेंबरपासून थांबा सुरू होणार

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अकोलेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेसला अकोला रेल्वे स्थानकावर थांबा देण्याच्या मागणीला यश आले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या थांब्याला मंजुरी दिली असून, २८ नोव्हेंबरपासून अकोला स्थानकावर या गाडीचा थांबा सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस ही महत्त्वाची रेल्वेगाडी अकोला स्थानकावर थांबावी, अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासून मागणी होती. या प्रश्नासाठी खासदार अनुप संजय धोत्रे यांनी पुढाकार घेत ९ जून २०२६ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे लेखी मागणी केली होती.

 

खासदार धोत्रे यांच्या पत्राची दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी गाडी क्रमांक १२२२१/१२२२२ पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेसला अकोला जंक्शनवर थांबा देण्यास मंजुरी दिल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

 

पुणे आणि हावडा प्रवास होणार सुकर

 

या निर्णयाचा लाभ अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांनाही होणार आहे. विशेषतः पुणे आणि हावडा येथे जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि नियमित प्रवाशांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वेगवान दुरंतो एक्सप्रेसला अकोल्यात थांबा मिळाल्याने प्रवाशांचा वेळ वाचण्यासह प्रवास अधिक सोयीचा होण्याची अपेक्षा आहे.

 

अकोला रेल्वे स्थानकाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असून, प्रवाशांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या या मंजुरीचे रेल्वे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

 

आता २८ नोव्हेंबरपासून दुरंतो अकोल्यात थांबणार असल्याने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

Don`t copy text!