Home Breaking News नातवाने पिचकारीने अंगावर रंग उडवल्याने आजीने चिडून उकळतं पाणी फेकलं ; चार...

नातवाने पिचकारीने अंगावर रंग उडवल्याने आजीने चिडून उकळतं पाणी फेकलं ; चार वर्षांचा चिमुकला भाजला

नातवाने पिचकारीने अंगावर रंग उडवल्याने आजीने चिडून उकळतं पाणी फेकलं ; चार वर्षांचा चिमुकला भाजला

नागपूर : रंग, आनंद आणि उत्साहाचा सण मानली जाणारी होळी–धुळवड यंदा नागपूर जिल्ह्यातील कोराडी परिसरात एका धक्कादायक घटनेमुळे काळवंडली. पिचकारीने रंग उडवल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या आजीने चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी फेकल्याने तो गंभीररीत्या भाजल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे (वय ४) असे जखमी बालकाचे नाव असून तो कोरडी येथील आरामशिन परिसरातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये आई-वडिलांसह राहत होता. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ओम घराबाहेर इतर मुलांसोबत पिचकारीने रंग खेळत होता. त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर गरम केलेले पाणी बादलीत घेऊन अंगणातून जात होत्या. खेळाच्या नादात ओमने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. मात्र या क्षुल्लक प्रकारामुळे संतापलेल्या आजीने हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट ओमच्या अंगावर फेकली. उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने किंचाळू लागला. त्याच्या कमरेखालच्या भागाला गंभीर भाजल्या गेल्याने घरच्यांनी तातडीने त्याच्यावर थंड पाणी टाकले. घटनेनंतर बालकाला तातडीने नागपूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार ओम सुमारे ४५ टक्के भाजल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडिओमध्ये काळ्या साडीत असलेली महिला हातात बादली घेऊन जाताना दिसते. त्यावेळी मुलगा पिचकारीने रंग उडवतो आणि संतापाच्या भरात ती त्याच्यावर बादलीतील गरम पाणी ओतताना दिसते. पाणी अंगावर पडताच मुलगा वेदनेने उड्या मारत ओरडताना दिसतो. त्यानंतर घरातील इतर महिलांनी धाव घेऊन त्याच्यावर थंड पाणी टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही फुटेजमध्ये दिसते. विशेष म्हणजे ओम हा त्या महिलेच्या मुलीचा मुलगा असून तो आई-वडिलांसह आजीकडेच राहत होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Don`t copy text!