Home Breaking News बँक ऑफ महाराष्ट्रच्या मांढळ शाखेत खळबळ : ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे लंपास...

बँक ऑफ महाराष्ट्रच्या मांढळ शाखेत खळबळ : ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे लंपास ! बँकेकडून तपास सुरू ; हॅकिंगद्वारे पैसे गायब झाल्याचा संशय

बँक ऑफ महाराष्ट्रच्या मांढळ शाखेत खळबळ : ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे लंपास ! बँकेकडून तपास सुरू ; हॅकिंगद्वारे पैसे गायब झाल्याचा संशय

कुही : मांढळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील काही ग्राहकांच्या (विशेषतः वयस्क ग्राहक) बँक खात्यातून पैसे परस्पर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे,काही विशिष्ट तारखेलाच ग्राहकांच्या खात्यातून ही रक्कम काढण्यात आली असून, याबाबत बँकेला कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पीडित ग्राहकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांढळ शाखेचे ग्राहक प्रभू मेश्राम, दत्तराज गोरबडे, वडेगाव येथील भागेरथा लुटे, तसेच माजरी येथील विनायक सेलोकर आणि गणेश नखाते यांच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने पैसे काढल्याचे समोर आले आहे. हे पाचच ग्राहक नाही तर आणखी ग्राहक या समस्येचे पीडित आहेत. या ग्राहकांनी जेव्हा आपले बँक खाते तपासले, तेव्हा त्यांना रक्कम कमी झाल्याचे निदर्शनास आले. पैसे काढले गेल्याचा कोणताही मेसेज किंवा ओटीपी ग्राहकांना न मिळाल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या प्रकरणी दत्तराज गोरबडे यांनी सायबर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. वरील ग्राहक बँक सुविधा केंद्रातून अंगठा लावूनच आजपर्यंत पैसे काढीत आलेले आहेत. या गंभीर प्रकारानंतर संतापलेल्या ग्राहकांनी बँकेत धाव घेऊन जाब विचारला. यावेळी बँक मॅनेजर आशिष सिंह चंदेल यांनी ग्राहकांना धीर देत सकारात्मक आश्वासन दिले. ”या प्रकरणाची बँकेने गंभीर दखल घेतली असून अंतर्गत तपास सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक हॅकिंगद्वारे हे पैसे काढले गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बँक या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करून हॅकर्सकडून पैसे वसूल करेल आणि पीडित ग्राहकांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळवून दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागातील बँकेतून अशा प्रकारे पैसे गायब झाल्यामुळे डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकाच वेळी अनेक ग्राहकांना लक्ष्य केल्यामुळे ही एखादी मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बँकेच्या या आश्वासनानंतर आता ग्राहकांचे लक्ष वसुलीकडे आणि बँक प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागले आहे. कुही तालुक्यात विविध राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांचे मोठे जाळे असताना, केवळ बँक ऑफ महाराष्ट्रच्या मांढळ शाखेतील ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम काढली जात असताना बँकिंग प्रणालीला किंवा खातेदारांना याची पुसटशी कल्पनाही नव्हती. केवळ ‘याच’ शाखेत प्रकार घडल्याने संशय बळावला आहे. कुही तालुक्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या मांढळ, वेलतूर, तारणा आणि तितूर अशा चार प्रमुख शाखा कार्यरत आहेत. याशिवाय तालुक्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी (HDFC) सारख्या नामांकित बँकांसह मांढळ, कुही व वेलतूर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाही मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. इतर सर्व बँकांचे व्यवहार सुरळीत सुरू असताना, केवळ मांढळ येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतच हॅकिंगचा हा प्रकार घडल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे आणि संशयाचे वातावरण आहे.

एकाच शाखेतील अनेक ग्राहकांना लक्ष्य केले गेल्याने ही एखाद्या संघटित सायबर टोळीची कारागिरी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतर शाखा सुरक्षित असताना केवळ मांढळ शाखेतच हा तांत्रिक बिघाड किंवा हॅकिंग कसे झाले, याचा शोध घेणे आता बँक प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. जेव्हा एखादा ग्राहक सी एस सी केंद्रात आधारकार्ड अपटेड करायला जातात तेव्हा तेथील संगणक ऑफरेटर ग्राहकांचे दहा बोटांपैकी नऊ बोटं लावून स्वतःचा एक बोट लावून ग्राहकांचे आधारकार्ड अपडेट करून देऊन नंतर त्याच बोटाच्या ठशा वरून पैसे काढू शकतो, अशी शक्यता ही जाणकार नागरिक व्यक्त करीत आहे.

Don`t copy text!