Home राजकीय अकोल्यात शिवसेनेचा मोठा राजकीय धमाका; विविध पक्षांतील नेते-पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशासाठी एकनाथ शिंदेंकडून हिरवा...

अकोल्यात शिवसेनेचा मोठा राजकीय धमाका; विविध पक्षांतील नेते-पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशासाठी एकनाथ शिंदेंकडून हिरवा कंदील

अकोला

 

 

श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला जिल्ह्यात आगामी काळात शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होण्याचे संकेत मिळत असून, विविध पक्षांतील प्रभावी नेते व पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाबाबत शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांच्याशी मुंबई येथे महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

अकोला जिल्हा विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, पक्षसंघटना विस्तार आणि विविध पक्षांतील इच्छुक नेते-पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी भव्य पक्षप्रवेश सोहळ्यासाठी वेळ देण्याची विनंतीही करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील विविध पक्षांतील अनेक प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटनात्मक बळकटीसाठी मोठी रणनीती आखत आहे.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच वेळ देऊन जिल्ह्यातील इच्छुक नेते व पदाधिकाऱ्यांचा जंगी पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.

या संभाव्य पक्षप्रवेशांमुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी दिली.

Don`t copy text!