श्रीकांत पाचकवडे
अकोला : ग्रामपंचायत सदस्यापासून ते लोकसभा खासदारापर्यंतचा राजकीय प्रवास यशस्वी करण्यासाठी बूथ स्तरावरील संघटन मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांना लोकप्रतिनिधी बनण्याची इच्छा आहे, त्यांनी BLO-SIR (बूथ लेव्हल ऑफिसर – स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) यंत्रणेचे महत्त्व समजून घेऊन तळागाळात कामाला लागावे, असे प्रतिपादन शिवसेना अकोला जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार राजन साळवी यांनी केले.
मुर्तीजापूर येथील भागधारक भवनात आयोजित BLO-SIR (बूथ) प्रशिक्षण शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजन साळवी व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी निवडणूक अधिकारी अविनाश कणसे, नगरसेवक संजय अगलदरे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, युवासेना लोकसभा संपर्कप्रमुख विठ्ठल सरप, महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषाताई विरक, तालुकाप्रमुख दीपक दांदळे, धनंजय ढोके, देवाशीष भटकर, माजी उपसभापती गंफू शर्मा, नगरसेवक संदीप ढोरे, गौरव मोरे, अरुण माकोडे, श्रुती सुतारे, महिला आघाडी तालुकाप्रमुख, डॉ. अशोक ओळंबे, संतोष अनासने, आसिफ खान, प्रशांत घोरपडे, अभिजित मुळे, फिरोज खान आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षण शिबिरात प्रशांत घोरपडे यांनी उपस्थित बूथ प्रमुख आणि SIR प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शन केले. मतदार यादी पडताळणी प्रक्रिया, शिस्त, अचूक माहिती संकलन तसेच निवडणूक व्यवस्थापनातील बूथ पातळीवरील जबाबदाऱ्यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. BLO-SIR यंत्रणेची भूमिका आणि कार्यपद्धती याविषयीही त्यांनी सखोल माहिती दिली.
दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण शिबिराला मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातील BLO-SIR (बूथ) प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याची माहिती अनिल मालगे यांनी दिली.
ठळक मुद्दे :
मुर्तीजापूर येथे BLO-SIR (बूथ) प्रशिक्षण शिबिर संपन्न
माजी आमदार राजन साळवी यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
“लोकप्रतिनिधी व्हायचे असेल तर बूथ मजबूत करा” असा संदेश
मतदार यादी पडताळणी व संघटन बांधणीवर विशेष भर
बूथ प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती
निवडणूक व्यवस्थापनातील BLO-SIR यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित






