खामगाव | प्रतिनिधी
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या Agentforce World Tour Mumbai Hackathon या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खामगावच्या रुचिता पांडुरंग धंदर हिने प्रथम क्रमांक पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशामुळे खामगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेत जगभरातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ 375 स्पर्धकांची निवड पुढील फेरीसाठी करण्यात आली होती. रुचिताने सादर केलेला एआय (Artificial Intelligence) आधारित प्रोजेक्ट सर्वोत्कृष्ट ठरला आणि अंतिम फेरीत तिने प्रभावी कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले.
स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रेझेंटेशन आणि प्रकल्पाचे सादरीकरण. रुचिताने आत्मविश्वासपूर्ण मांडणी, विषयाचे सखोल ज्ञान आणि उत्कृष्ट संवादकौशल्याच्या जोरावर परीक्षकांना प्रभावित केले. विविध मूल्यांकन फेऱ्या, प्रश्नोत्तर सत्रे आणि कठोर परीक्षणानंतर तिने प्रथम क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल रुचिताला तब्बल 10 लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तिच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि नेतृत्वगुणांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
खामगावसारख्या शहरातील तरुणीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली क्षमता सिद्ध करत शहराचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. तिचे हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





