Home विदर्भ लोणार सरोवराच्या शाश्वत विकासाला वेग; मुख्यमंत्री फडणवीसांनी ३ महिन्यांत मागवला ॲक्शन टेकन...

लोणार सरोवराच्या शाश्वत विकासाला वेग; मुख्यमंत्री फडणवीसांनी ३ महिन्यांत मागवला ॲक्शन टेकन रिपोर्ट

लोणार सरोवर विकास आराखडा
लोणार सरोवर

बुलढाणा, दि. ६ : जागतिक वारसा, आंतरराष्ट्रीय रामसार स्थळ आणि नैसर्गिक आश्चर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणार सरोवराच्या संवर्धन, जतन आणि शाश्वत विकासासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ४३४.६२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती देण्यात आली असून, सुरू असलेल्या आणि प्रस्तावित सर्व कामांचा सविस्तर ॲक्शन टेकन रिपोर्ट (ATR) पुढील तीन महिन्यांत मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यापूर्वी विविध योजनांद्वारे पाठपुरावा केला आहे. आता राज्य शासनाकडून केंद्राकडे सादर होणारा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन अधिक सक्षम करण्यात येत असून, प्रलंबित प्रस्तावांना वेग देण्यासाठी निश्चित कालमर्यादा आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले आहे.

पाण्याच्या वाढत्या पातळीचा वैज्ञानिक अभ्यास

मागील काही वर्षांत लोणार सरोवरातील जलपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सरोवराचे पाणी सुमारे २० मीटरपर्यंत आत शिरल्याने काही प्राचीन मंदिरे आणि नैसर्गिक वनसंपदा पाण्याखाली गेली आहे. गोमुख धार, पापारेश्वर मंदिर परिसर आणि सीतानान्ही येथील नैसर्गिक झऱ्यांमधून दर तासाला सुमारे २४ हजार ५४० लिटर गोड पाणी सरोवरात येत असल्याचे तांत्रिक मोजमापातून स्पष्ट झाले आहे.

या बदलांचा अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली विशेष तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे (GSDA) तज्ज्ञ मे २०२६ ते सप्टेंबर २०२७ या कालावधीत संपूर्ण हायड्रोलॉजिकल सायकलचा अभ्यास करणार असून, विशेष निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून भूजल आणि जलपातळीबाबत सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे.

४३४ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी

लोणार सरोवराच्या जतन आणि विकासासाठी ४३४.६२ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पात ९ कार्यान्वयीन यंत्रणा सहभागी असून, आतापर्यंत २१९.७४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी २०९.८५ कोटी रुपये विविध विभागांना वितरित करण्यात आले आहेत.

एकूण ७६ कामांपैकी ३३ कामे पूर्ण झाली असून, ३१ कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित कामे अंदाजपत्रक स्तरावर आहेत.

पूर्ण झालेल्या महत्त्वाच्या कामांचा समावेश

– स्मशानभूमी व कब्रस्तानचे यशस्वी स्थलांतर
– सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची दुरुस्ती
– ३.५ किलोमीटर लांबीचा पर्यटक पदपथ
– निसर्ग पाऊलवाटा आणि माहिती केंद्र
– पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा
– ४० हेक्टर क्षेत्रात वेडी बाभूळ हटवून वृक्षलागवड

प्रगतीपथावरील प्रमुख प्रकल्प

– १०६.७० कोटी रुपयांची नवीन सांडपाणी प्रक्रिया व भूमिगत गटार योजना
– ३५ कोटी रुपयांची शहर पाणीपुरवठा योजना
– १३.६१ कोटी रुपयांचा लोणार-किन्ही बायपास रस्ता
– तारांगण आणि प्रादेशिक संग्रहालय उभारणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोणार सरोवराचा विकास पर्यावरणीय संतुलन राखत आणि जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. या प्रकल्पांमुळे लोणार सरोवराचा जागतिक वारसा अधिक प्रभावीपणे जपला जाईल आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Don`t copy text!