Home Breaking News गांधी चौक महिला मारहाण प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

गांधी चौक महिला मारहाण प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अकोला
श्रीकांत पाचकवडे 
अकोला : गांधी चौक परिसरात महिला व तिच्या पतीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
५ जून २०२६ रोजी फिर्यादी महिला आपल्या पतीसोबत खरेदीसाठी गांधी चौक येथे गेल्या असता एका दुचाकीस्वाराने त्यांना धक्का दिला. याबाबत जाब विचारल्यावर संबंधित व्यक्तीने महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिच्यासह पतीवर लोखंडी पाइपने हल्ला केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२३/२०२६ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी विशेष पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली.
तपासादरम्यान व्हिडिओच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली. आरोपीचे नाव मोहम्मद अमीन अब्दुल मजीद (वय ३६, रा. साबरिया चौक, अकोट फैल, अकोला) असे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे मोबाईल फोन नसल्याने त्याचा तांत्रिक पद्धतीने माग काढणे कठीण झाले होते. घटनेनंतर तो फरार झाला होता. त्याच्या नातेवाईक, मित्रपरिवार तसेच अकोला परिसरात शोधमोहीम राबवूनही तो हाती लागत नव्हता.
दरम्यान, ८ जून रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी पाचमोरी-अकोट फैल परिसरात फिरत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणासंदर्भात एका दैनिकात आरोपी हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा नातेवाईक असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र पोलिसांनी याबाबत पडताळणी केली असता संबंधित दाव्यात कोणतेही तथ्य आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, गोपाल जाधव, उपनिरीक्षक माजिद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
Don`t copy text!