Home Breaking News नवीन ३३ केव्ही रामापूर उपकेंद्राचे लोकार्पण; हजारो ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ

नवीन ३३ केव्ही रामापूर उपकेंद्राचे लोकार्पण; हजारो ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ

३३ केव्ही रामापूर उपकेंद्र
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोट तालुक्यातील रामापूर येथे महावितरणने उभारलेल्या नवीन ३३ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपकेंद्रामुळे रामापूर, धारूळ, रानापूर, कासोद आदी गावांतील हजारो वीज ग्राहकांना अधिक विश्वासार्ह, दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
पायाभूत आराखडा प्रणाली मजबुतीकरण (System Strengthening) योजनेअंतर्गत सुमारे ३ कोटी ४ लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या उपकेंद्राची क्षमता ५ एमव्हीए आहे. उपकेंद्राला ३३ केव्ही मोहाला उपकेंद्रातून ५.५ किलोमीटर लांबीच्या वाहिनीद्वारे वीजपुरवठा जोडण्यात आला आहे.
लोकार्पण सोहळ्याला महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता प्रतिक्षा शंभरकर, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता दीपक सोनोने, कार्यकारी अभियंता संजय कुटे आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता यामिनी पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपकेंद्रामार्फत परिसरातील ५६९ शेतकरी व ७९३ घरगुती तसेच वाणिज्यिक ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी ११ केव्ही तलाव कृषी फिडर, धारूळ फिडर आणि कासोद गावठाण फिडर कार्यान्वित करण्यात आले आहेत.
दरम्यान, रामापूर उपकेंद्र सुरू झाल्यामुळे ३३ केव्ही लखमापूर उपकेंद्रावरील भार कमी करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. नियोजनानुसार लखमापूर उपकेंद्रावरील ५० रोहित्रांपैकी २९ रोहित्रांचे स्थलांतर पूर्ण झाले असून उर्वरित २१ रोहित्रांचे काम सुरू आहे. तसेच उमरा उपकेंद्रावरील ११ रोहित्रेही रामापूर उपकेंद्राकडे स्थलांतरित करण्यात येत आहेत.
या स्थलांतरामुळे लखमापूर आणि उमरा उपकेंद्रांवरील ताण कमी होणार असून संबंधित भागातील ग्राहकांनाही अधिक स्थिर, दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
ठळक मुद्दे
रामापूर येथे नवीन ३३ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण
३ कोटी ४ लाख रुपयांच्या खर्चातून उभारणी
५ एमव्हीए क्षमतेचे आधुनिक उपकेंद्र
५६९ शेतकरी व ७९३ घरगुती-वाणिज्यिक ग्राहकांना लाभ
लखमापूर व उमरा उपकेंद्रांवरील भार कमी होणार
परिसरात अधिक दर्जेदार व अखंडित वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होणार.
Don`t copy text!