ऑपरेशन प्रहारचा अकोल्यात धडाका!
“ऑपरेशन प्रहार” अंतर्गत जिल्हाभर धडक मोहीम
231 गुन्हे दाखल; अवैध दारू व्यवसायिकांवर कारवाई
₹26.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट
सर्व पोलीस ठाण्यांचा समन्वित सहभाग
अवैध मद्यविक्रीविरोधातील कारवाई आणखी तीव्र होणार
नागरिकांना माहिती देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला जिल्ह्यात अवैध गावठी व देशी दारूच्या निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात अकोला पोलीस दलाने राबविलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेत मोठे यश संपादन केले आहे. पोलीस अधीक्षक अचिंत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 मे ते 6 जून 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात 231 गुन्हे दाखल करण्यात आले असून 26 लाख 50 हजार 670 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करून न्यायालयीन आदेशानुसार नष्ट करण्यात आला आहे.
अवैध मद्यनिर्मितीमुळे समाजात वाढणारे गुन्हे, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या लक्षात घेऊन जिल्हाभर एकाचवेळी धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी त्यांना कडक इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील रामदासपेठ, सिव्हिल लाईन, स्थानिक गुन्हे शाखा, जुने शहर, खदान, डाबकी रोड, एमआयडीसी, अकोट शहर, अकोट ग्रामीण, तेल्हारा, हिवरखेड, दहिहंडा, बाळापूर, पातूर, चान्नी, उरळ, मूर्तिजापूर शहर, मूर्तिजापूर ग्रामीण, बोरगाव मंजू, बार्शीटाकळी, पिंजर आणि माना पोलीस ठाण्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, अवैध मद्यनिर्मिती व विक्री हा केवळ कायद्याचा भंग नसून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहेत.
जनतेला आवाहन
अवैध गावठी दारूची निर्मिती, साठवणूक, वाहतूक अथवा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
ठळक मुद्दे
“ऑपरेशन प्रहार” अंतर्गत जिल्हाभर धडक मोहीम
231 गुन्हे दाखल; अवैध दारू व्यवसायिकांवर कारवाई
₹26.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट
सर्व पोलीस ठाण्यांचा समन्वित सहभाग
अवैध मद्यविक्रीविरोधातील कारवाई आणखी तीव्र होणार
नागरिकांना माहिती देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन“अवैध दारूविरोधातील लढा अधिक तीव्र करून सुरक्षित व गुन्हेमुक्त समाज घडविण्यासाठी अकोला पोलीस दल कटिबद्ध आहे,” असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.





