Home Breaking News आमदार साजिद खान पठाण यांना राज्य शासनाकडून ‘वाय प्लस’ एस्कॉर्ट सुरक्षा

आमदार साजिद खान पठाण यांना राज्य शासनाकडून ‘वाय प्लस’ एस्कॉर्ट सुरक्षा

 

अकोला | श्रीकांत पाचकवडे 

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांना मिळालेल्या वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या, खंडणीची मागणी तसेच सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या धोक्याच्या मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘वाय प्लस’ एस्कॉर्ट सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुरक्षा महाराष्ट्रासह आवश्यकतेनुसार राज्याबाहेरील दौऱ्यांदरम्यानही लागू राहणार आहे.

माहितीनुसार, आमदार पठाण यांनी शुभम लोणकर याच्याकडून दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तसेच खंडणीची मागणी झाल्याची तक्रार संबंधित यंत्रणांकडे केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनीही सभागृहात त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या सुरक्षा व्यवस्थेनुसार आमदार पठाण यांच्यासोबत २४ तास एक एस्कॉर्ट वाहन, पोलीस अधिकारी आणि सशस्त्र पोलीस जवान तैनात राहतील. त्यांच्या दौऱ्यांदरम्यान तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

दरम्यान, धमकी आणि खंडणीच्या प्रकरणाचा तपास संबंधित तपास यंत्रणांकडून सुरू असून सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्दे

– आमदार साजिद खान पठाण यांना ‘वाय प्लस’ एस्कॉर्ट सुरक्षा मंजूर.
– जीवे मारण्याच्या धमक्या आणि खंडणी प्रकरणानंतर शासनाचा निर्णय.
– २४ तास एस्कॉर्ट वाहन, पोलीस अधिकारी आणि सशस्त्र जवानांची तैनाती.
– महाराष्ट्रासह आवश्यकतेनुसार राज्याबाहेरील दौऱ्यांदरम्यानही सुरक्षा लागू.
– धमकी आणि खंडणी प्रकरणाचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू.

Don`t copy text!