खामगाव | प्रतिनिधी
खामगाव शहरातील सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट, सोनी पॅथॉलॉजी व सोनी ब्लड बँकेचे संचालक, तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोपाल मुरलीधर सोनी (वय 54) यांचे रविवारी दुपारी त्यांच्या शेलोडी शिवारातील शेतात आकस्मिक निधन झाले. या घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून, मृत्यूमागील कारणांबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शेतात आढळले बेशुद्ध अवस्थेत
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सोनी हे रविवारी त्यांच्या शेतात गेले होते. तेथे काही तरुणही उपस्थित होते. काही कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर डॉ. सोनी अचानक कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
‘मला सीपीआर द्या’ असे म्हणाल्याची माहिती
प्राथमिक माहितीनुसार, डॉ. सोनी कोसळत असताना “मला सीपीआर द्या” असे म्हणत असल्याचे उपस्थितांनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र त्यावेळी योग्य प्रकारे सीपीआर न मिळाल्याची बाबही चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
घातपाताचा संशय; शरीरावर जखमांच्या खुणा
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सोनी यांच्या शर्टाची तीन बटणे तुटलेली होती. तसेच छाती, पाठ, गुडघे व पायावर खरचटल्याच्या खुणा होत्या. त्यांचा चष्माही तुटलेला असल्याने या प्रकरणात घातपाताचा संशय अधिक गडद झाला आहे.
पोलिसांकडून तिघांची चौकशी
या प्रकरणात पोलिसांनी शेतातील व बाहेरील संबंधित अशा तिघा तरुणांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांना तपास पूर्ण होईपर्यंत बाहेरगावी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेचा सखोल तपास सुरू असून, अधिक माहिती चौकशीनंतर समोर येण्याची शक्यता आहे.
शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा
डॉ. सोनी यांचे पार्थिव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
सामाजिक क्षेत्रातही सक्रिय योगदान
डॉ. गोपाल सोनी हे सोनी ब्लड बँकेचे संचालक, खामगाव मूकबधिर विद्यालयाचे अध्यक्ष, तसेच विविध सामाजिक संस्थांशी निगडित होते. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.






