Home विदर्भ कोरड्या दुष्काळाबाबत शासन उदासीन; ‘रुमणे’ घेऊन रस्त्यावर उतरू – गोपाल तायडे यांचा...

कोरड्या दुष्काळाबाबत शासन उदासीन; ‘रुमणे’ घेऊन रस्त्यावर उतरू – गोपाल तायडे यांचा इशारा”

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.

शेगाव :  तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यांसारखी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत करपून गेल्याने शेगाव तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. या अत्यंत गंभीर परिस्थितीवर स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासन आणि प्रशासनाने एसी केबिनमधून बाहेर पडून तात्काळ शेतशिवारांचे संयुक्त पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास शेतकरी हातात ‘रुमणे’ (बैल हाकण्याची काठी) घेऊन रस्त्यावर उतरेल, असा थेट इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.यंदा सुरुवातीला शेतकऱ्यांनी पदरमोड करून, महागडी बियाणे खरेदी करून पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, आधी बाजारातील बोगस बियाण्यांचा फटका आणि त्यानंतर पावसाने ओढलेली ताण यामुळे बळीराजा अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे. सध्याची परिस्थिती पाहता मशागतीचा आणि लागवडीचा खर्च निघणेही आता दुरापास्त झाले आहे. यामुळे शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे.स्वराज्य पक्षाच्या प्रमुख मागण्या:तात्काळ संयुक्त पंचनामे: कृषी व महसूल विभागाने तात्काळ गावागावांत जाऊन पिकांच्या नुकसानीचे पारदर्शक पंचनामे करावेत.भरीव हेक्टरी मदत: खरीप पीक नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत जमा करावी.कोरडा दुष्काळ जाहीर करा: शेगाव तालुक्यातील भीषण टंचाई पाहता हा तालुका अधिकृतपणे ‘दुष्काळग्रस्त’ घोषित करण्यात यावा.कर्जमाफी व पीकविमा: तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन पीकविमा मंजूर करण्यात यावा.शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे आणि शासन-प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे, अशी टीका गोपाल तायडे यांनी केली आहे. आता शेतकऱ्यांचा संयम सुटला असून, जर प्रशासनाने त्वरित शेतीपिकांचे पंचनामे पूर्ण करून ठोस मदतीची घोषणा केली नाही, तर स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‘हातात रुमणे घ्या, रस्त्यावर उतरा’ हे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा प्रेस नोटद्वारे देण्यात आला आहे.प्रसिद्धीसाठी धन्यवाद!- स्वराज्य पक्ष, शेगाव तालुका शाखा.

Don`t copy text!