Home Breaking News Akola News : अग्रो मॅक्सच्या गोदामातून ६९ कट्टे तूर चोरी; सहा आरोपी...

Akola News : अग्रो मॅक्सच्या गोदामातून ६९ कट्टे तूर चोरी; सहा आरोपी जेरबंद

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; ९.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला (Akola News ): एमआयडीसी परिसरातील अग्रो मॅक्स कंपनीच्या गोदामातून चोरीला गेलेल्या तुरीच्या ६९ कट्ट्यांचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले असून, चोरीची तूर व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा ९ लाख ३१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

अग्रो मॅक्स वेअरहाउसचे सुपरवायझर निलेश बिचकुंदे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी गोदाम बंद करून कर्मचारी घरी गेले होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी सकाळी गोदाम उघडण्यासाठी आले असता मागील बाजूचे शटर वाकलेल्या अवस्थेत आढळले. तपासणी केली असता गोदामातील ६० किलो वजनाचे तुरीचे ६९ कट्टे गायब असल्याचे स्पष्ट झाले. चोरीच्या मालाची किंमत ३ लाख ३१ हजार २०० रुपये होती.

 

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.

 

पोलिसांनी गणेश कुंजीलाल लांजेवार, अमित राजेश पांडे, शुभम अशोक खडसे, स्वप्नील अशोक दांडगे, राजा मन्सु धुर्वे आणि शरिफ खान रशीद खान यांना ताब्यात घेतले.

 

चोरीचा माल आणि वाहन जप्त

आरोपींकडून चोरीचे ६९ कट्टे तूर आणि एमएच ३० बीडी ५६८१ क्रमांकाची चारचाकी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या तुरीची किंमत ३ लाख ३१ हजार २०० रुपये, तर वाहनाची किंमत ६ लाख रुपये असून, एकूण ९ लाख ३१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

Akola News

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी ठाणेदार सपोनि विजय जाधव, पोहेकॉ विजय अंभोरे, पाहेकॉ सतीश प्रधान आणि पोकॉ निलेश वाकोडे यांच्या पथकाने केली.

 

गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ विजय अंभोरे करीत आहेत.

Don`t copy text!