Home विदर्भ हजारो ब्रास मुरूमची लूट; रॉयल्टीविना वाहतुकीचा आरोप

हजारो ब्रास मुरूमची लूट; रॉयल्टीविना वाहतुकीचा आरोप

शिवणी विमानतळासमोरील महामार्ग परिसरात बेकायदा उत्खनन? विनाक्रमांकाच्या पोकलँडने मुरूम उपसल्याचा दावा; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : शिवणी विमानतळासमोरील राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या पुलाच्या कामाच्या परिसरातून हजारो ब्रास मुरूम रॉयल्टी न भरता अन्यत्र वाहून नेला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर महामार्गालगतच विनापरवानगी उत्खनन करून मोठ्या प्रमाणात मुरूम काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाला कोट्यवधींचा फटका बसत असल्याची चर्चा असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

मुरूमाची रॉयल्टी भरली का?

 

 

शिवणी विमानतळापासून हॉटेल स्पाइसपर्यंत एमआयडीसीलगत महामार्गाच्या कडेला रस्त्याच्या कामासाठी साठवून ठेवलेला मुरूम अन्य ठिकाणी नेला जात असल्याचे सांगितले जात आहे. नियमानुसार गौण खनिज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना आवश्यक रॉयल्टी भरणे अपेक्षित असते. मात्र, संबंधित मुरूम रॉयल्टीविना वाहतूक केला जात असल्याचा आरोप आहे.

जर हजारो ब्रास मुरूमाची वाहतूक रॉयल्टी न भरता झाली असेल, तर शासनाचा नेमका किती महसूल बुडाला, याची तपासणी करण्याची गरज आहे.

 

महामार्गाच्या कडेलाच उत्खनन?

 

कंत्राटदाराने केवळ साठवून ठेवलेला मुरूम हलविल्याचा आरोप नसून, महामार्गाच्या कडेला उत्खनन करून मुरूम काढल्याचाही दावा केला जात आहे. या उत्खननातून हजारो ब्रास मुरूम काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे या कामासाठी विनाक्रमांकाचे पोकलँड मशीन वापरण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित मशीनची नोंदणी, परवाना, कर तसेच उत्खननासाठी आवश्यक परवानग्यांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

 

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रकार वाढला?

 

इतक्या मोठ्या प्रमाणावर कथित उत्खनन आणि मुरूम वाहतूक सुरू असताना महसूल व खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती होती का, असा सवाल उपस्थित होत आहे. माहिती असूनही कारवाई झाली नसेल तर त्यामागचे कारण काय, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

तहसीलदार आणि जिल्हा खनिकर्म विभागाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका किंवा अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.

 

आरटीओनेही तपासणी करावी

 

महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आरटीओ विभागाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. विशेषतः कथित विनाक्रमांकाच्या पोकलँडची नोंदणी, कर, परवाना आणि अन्य कागदपत्रांची तपासणी केल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.

 

रखडलेल्या पुलामुळे नागरिक त्रस्त

 

दरम्यान, शिवणी विमानतळासमोरील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम रखडल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

एकीकडे पुलाचे काम रखडलेले असताना दुसरीकडे याच परिसरातील मुरूमाच्या कथित अवैध उत्खनन व वाहतुकीचे प्रकरण समोर आल्याने प्रशासनासमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी

या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. किती ब्रास मुरूम काढण्यात आला, किती मुरूमाची वाहतूक झाली, त्याची रॉयल्टी भरली का, उत्खननासाठी परवानगी होती का आणि शासनाचा किती महसूल बुडाला, याची अधिकृत मोजणी करणे गरजेचे आहे.

शासनाचा महसूल बुडाला असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून नुकसानभरपाई वसूल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!