Home महाराष्ट्र Akola News : छातीवर दगड ठेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या; शंभू सेनेचे अनोखे...

Akola News : छातीवर दगड ठेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या; शंभू सेनेचे अनोखे आंदोलन

Akola News : कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अपुरा आणि अनियमित पाऊस, पिकांचे नुकसान आणि वाढते आर्थिक संकट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शंभू सेना सामाजिक संघटनेने मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन केले. आंदोलकांनी छातीवर दगड ठेवून शेतकऱ्यांच्या व्यथा शासनासमोर मांडल्या.

 

 

‘शेतकरी काळजावर दगड ठेवून संकटांचा सामना करीत आहे’ असा संदेश देत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

Akola News :पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तसेच फळबागांसह विविध पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची तातडीने दखल घेण्याची मागणी संघटनेने केली.

शंभू सेनेच्या प्रमुख मागण्या

पावसाअभावी नुकसान झालेल्या गावांचे तातडीने सर्वेक्षण करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा.

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी.

पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मिळवून द्यावी.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून व्याजात सवलत द्यावी.

जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

पुढील हंगामासाठी बियाणे, खते व कृषी निविष्ठांसाठी आर्थिक मदत द्यावी.

दुष्काळी सवलती व शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना तातडीने मिळवून द्यावा.

मदतीपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी विशेष यंत्रणा उभारावी.

सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी २४ तास वीजपुरवठा करावा.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी २ लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.

२०१९ पूर्वी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा.

 

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार

 

“शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा आधार आहे. मात्र अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे त्याच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन मदत जाहीर करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा शंभू सेना सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Akola News

Akola News :आंदोलनात संस्थापक अध्यक्ष अश्विन उद्धवराव नवले, सुभाष साबे, बार्शीटाकळी तालुका प्रमुख सचिन आगाशे, प्रमोद पाचपोर, राजेश दांडेकर, गणेश गोगे, सचिन चांभारे, अतुल ठाकरे, बाळुभाऊ कसुरकार, मधुकर सोनारगण, दीपक कळसाईत, गणेश खरात, मकरंद पाटोळे, सचिन सोनटक्के, शामकुमार वाघेले, राजेश शिंदे, योगेश वाव्हाळ, गोपाल सरोदे, अतुल बोके, आकाश मस्तूद, नितीन मंगलवार, गजानन नागलकर, गजानन पाटील, आकाश गवळी यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Don`t copy text!