अकोट तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी; एसडीओंना निवेदन
कुशल भगत
अकोट : अकोट तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी अकोट शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकदिवसीय उपोषण करण्यात आले.
सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पावसाची कमतरता, पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक संकट यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला.
‘घोषणा नको, दुष्काळ जाहीर करा!’
उपोषणादरम्यान आंदोलकांनी “आता घोषणा नको, दुष्काळ जाहीर करा” अशी भूमिका घेत शासनाकडे अकोट तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई, कर्जमाफी तसेच अन्य आवश्यक सवलती देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या उपोषणात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






