Home विदर्भ मजीप्राचे पाईप चोरणारी टोळी अकोट ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात!

मजीप्राचे पाईप चोरणारी टोळी अकोट ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात!

 

८२ पाईप्ससह दोन आयशर ट्रक, फोरव्हीलर असा ४३.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे अटकेत

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ठेवण्यात आलेले पाईप चोरणाऱ्या टोळीचा अकोट ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८२ पाईप्स, दोन आयशर ट्रक आणि एक फोरव्हीलर असा एकूण ४३ लाख ३९ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

 

रात्रीच्या गस्तीने चोरट्यांचा डाव उधळला

 

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीची गस्त वाढविण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिले होते. त्यानुसार १४ सप्टेंबरच्या रात्री अकोट ग्रामीण पोलिसांचे पथक गस्तीवर असताना अकोली जहाँगीर फाटा परिसरात दोन आयशर ट्रक संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळले.

पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली असता काही व्यक्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाईप ट्रकमध्ये भरताना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच फोरव्हीलरमधील काही संशयित घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी दोन्ही ट्रक आणि चालकांना ताब्यात घेतले.

 

चौकशीत चोरीचा पर्दाफाश

 

ताब्यात घेतलेल्या चालकांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अकोट उपविभागाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर हे पाईप पोपटखेड गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात अप. क्र. ६४२/२०२६ अन्वये BNS कलम ३०३(२) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघे आरोपी अटकेत

पोलिसांनी या प्रकरणात पुढील तिघांना अटक केली आहे—

१. मनिष अरुणराव मैन (२९)

नटाळा पुनर्वसन, वॉर्ड क्र. २, वर्धा.

२. कपील अशोकराव दुधे (४१)

पुजई, ता. जि. वर्धा.

३. प्रभाकर वसंतराव भताने (३९)

गोढाळा, ता. रेणापूर, जि. लातूर.

पोलिसांच्या तपासानुसार, प्रभाकर भताने याच्या सांगण्यावरून पाईप चोरी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

 

कारवाईदरम्यान पोलिसांनी ९ लाख ३९ हजार २२८ रुपये किमतीचे ८२ पाईप्स, दोन आयशर ट्रक आणि एक फोरव्हीलर असा ४३ लाख ३९ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टोळीतील आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच चोरीमागील संपूर्ण नेटवर्क काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे, पोउपनि. वैभव तायडे यांच्यासह पोलीस कर्मचारी योगेश जऊळकार, भास्कर सांगळे, गोपाल जाधव, गणेश फोकमारे, विठ्ठल चव्हाण, शैलेश जाधव, शुभम लुंगे, शुभम गिरी, आशिष आमले, स्वप्नील दामोदर तसेच होमगार्ड सुनील वाळके व प्रवीण इंगळे यांनी सहभाग घेतला.

Don`t copy text!