शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार प्रकाश झोडगे यांचे आवाहन; नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे मंडळांना निर्देश
राजेश पल्हाडे
वाडेगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाडेगाव पोलीस चौकी येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांना आवश्यक सूचना दिल्या.
बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचे संयोजन वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विनोद खाडे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, तंटामुक्त समिती अध्यक्ष सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील मानकर व सुनील घाटोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका, ध्वनिक्षेपक, डीजे, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी दिल्या. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
वाडेगावची शांतता व सलोख्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
पदाधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन
बैठकीत विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव आयोजनासंदर्भातील प्रश्न व अडचणी मांडल्या. पोलिस प्रशासनाकडून त्यांचे निरसन करण्यात आले. नियमांचे पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची ग्वाही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीला प्रकाश कंडारकर, दीपक मसने, संदीप जढाळ, शामलाल लोध, दयाराम डोंगरे, रणजित अहीर, अंकुश शहाणे, दत्ता मानकर, चेतन कारंजकर, अमोल बावणे, नईम जमदार, गोपाळ वाघ यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, पत्रकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






