१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन; अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची बैठक
श्रीकांत पाचकवडे
अकोला : सामान्य नागरिकांना शासकीय सेवा आणि विविध योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. अमरावती विभागातील सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले.
अभियानाच्या नियोजनासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी अमरावती विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
नागरिकांना थेट सेवांचा लाभ देण्यावर भर
महसूल, ग्रामविकास, शिक्षण, नगरविकास, पाणीपुरवठा, आरोग्य, वन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योग, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, दिव्यांग कल्याण, माहिती व जनसंपर्क यांसह विविध विभागांनी आपल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना अभियानाच्या कालावधीत प्राधान्याने सेवा द्याव्यात, असे निर्देश गुंडे यांनी दिले.
‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना आणि सेवा पोहोचविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.
फेरफार नोंदीपासून दिव्यांग प्रमाणपत्रांपर्यंत सेवा
अभियानात प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, ‘जिवंत सातबारा’ मोहीम, बळीराजा शेत व पाणंद रस्ते उपलब्ध करून देणे, शिधापत्रिका व विविध प्रमाणपत्रांचे वितरण, जन्म-मृत्यू नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्रे, शिकाऊ व वाहनचालक परवाने तसेच सातबारा व ८-अ उताऱ्यांच्या नोंदी अद्ययावत करणे आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे, सिंधी समाजातील लाभार्थ्यांना पट्टे वाटप, पारधी बेड्यांवर जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविणे, तलाठी कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करणे, गावपातळीवर स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करणे आणि वनहक्क दावे निकाली काढणे यावरही भर देण्यात आला.
विविध उपक्रमांनी अभियानाला व्यापक स्वरूप
‘सेवा संकल्प अभियान’ांतर्गत सेवा सेतू, इनोव्हेशन चॅलेंज, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवाज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभार व संकल्पाची रांगोळी, नमो सेवागाथा, जल-जन-सेवा संकल्प यात्रा आणि जनसेवक महाकुंभ यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
कर्मचाऱ्यांसाठीही आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीला जिल्हाधिकारी आशिष येरेकर, वर्षा मीना, प्रवीण देवरे, विकास मीना, योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, नयन नावंदर, गुलाबराव खरात, विशाल खत्री, अर्पित चव्हाण तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, सुनील लहाने यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत ‘सेवा संकल्प अभियान’ाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. विविध विभागांचे प्रधान सचिव व सचिव यावेळी उपस्थित होते.






