कुटासात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची बैठक
कुशल भगत
कुटासा : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दहीहांडा पोलिसांनी कुटासा येथे सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
१५ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या बैठकीला दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले, ग्रामपंचायत प्रशासक संजय डाबेराव, पोलीस पाटील, माजी समाजकल्याण सभापती विजय सिंग सोळंके, पत्रकार कुशल शं. भगत, माजी पं.स. सदस्य अर्जुनसिंग सोळंके यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन पोलिसांनी केले. यावेळी मंडळांच्या अडचणी व सूचनाही जाणून घेण्यात आल्या.
बैठकीत पोलिसांच्या महत्त्वपूर्ण सूचना
🔹 डीजेला टाळा : गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.
🔹 सूचना फलक लावा : वरिष्ठ पोलीस व प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे बॅनर मंडप परिसरात लावावेत.
🔹 मद्यप्राशन करून वाहन चालवू नये : विसर्जन मिरवणुकीतील ट्रॅक्टर चालकाने मद्यप्राशन केलेले नसावे.
🔹 वीज जोडणी सुरक्षित पद्धतीने : मंडप व रोषणाईची विद्युत जोडणी केवळ अनुज्ञप्तीधारक वायरमनकडूनच करून घ्यावी.
🔹 मिरवणूक वेळेत पूर्ण करा : विसर्जन मिरवणूक विनाकारण रेंगाळू नये. पूर्वनियोजित मार्गात कोणताही बदल करू नये.
🔹 स्वयंसेवक तैनात ठेवा : गर्दीचे नियोजन आणि सुरक्षिततेसाठी मंडळांनी पुरेसे स्वयंसेवक नियुक्त करावेत.
🔹 वाद टाळा, शिस्त पाळा : मंडळांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांमध्ये वाद होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
मिरवणूक मार्गाची पाहणी
बैठकीनंतर ग्रामपंचायत प्रशासक आणि पोलीस पाटील यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत गावातील विसर्जन मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. गणेशोत्सव शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करण्याचे आश्वासन मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिले.






