Home विदर्भ ऑपरेशन प्रहार : खदान पोलिसांची अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; २७.६२ लाखांचा...

ऑपरेशन प्रहार : खदान पोलिसांची अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

९ वाहने, ८ मोबाईल आणि रोख रकमेसह ८ जण ताब्यात; अल्पवयीनासह ६ जण फरार

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अवैध जुगाराविरोधात अकोला पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत खदान पोलिसांच्या पथकाने येवता रोड, मलकापूर येथील क्लासमेट हॉटेल अँड बार परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत ९ वाहने, ८ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण २७ लाख ६२ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. यावेळी जुगार सुरू असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी कारवाई करत संबंधितांकडून मुद्देमाल ताब्यात घेतला.

 

या प्रकरणात कुणाल सुनिलकुमार मनवानी (२६), कुशल विमलकुमार कायना (२१), जतीन सुनिलकुमार मनवानी (१९), दिपक परमानंद सिदारा (४१), निशांत मेघराज बजाज (२४), राहुल दौलत चौथानी (२५), आशीष चंदुलाल जसवानी (२८) आणि रोशन अनिलकुमार राजपाल (२४) यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

 

तसेच वंश महेशकुमार टकरानी (१७ वर्षे ६ महिने) याचाही प्रकरणात समावेश असून, सुमीत गुरबानी, पवन चेनानी, कौशिक प्रकाश शोधनानी, अमित बालचंदानी, जितेंद्र कमलकुमार खबरानी आणि विजय अहुजा हे आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

कारवाईदरम्यान ९ वाहने, ८ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ₹२७,६२,८१० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवित्रकार तसेच पोलीस अंमलदार निलेश खंडारे, भूषण मोरे, गिरीष वीर, प्रविण डोंगरे, अभिमन्यु सदांशिव, शिवम दुबे, मंगेश खेडकर, वैभव कस्तुरे आणि आकाश कठाने यांच्या पथकाने केली.

Don`t copy text!