Home विदर्भ अकोला दुष्काळाच्या छायेत; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या!  आमदार साजिद खान पठाण

अकोला दुष्काळाच्या छायेत; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या!  आमदार साजिद खान पठाण

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन; सरसकट कर्जमाफीचीही मागणी

श्रीकांत पाचकवडे

अकोला : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने अकोला जिल्ह्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. पावसातील खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून अनेक भागांत पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त किंवा दुष्काळसदृश घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषिमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार पठाण यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेत जिल्ह्यातील पावसाची स्थिती, खरीप पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट याबाबत निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, मागील काही काळापासून अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाला आहे. उत्पादन घटण्याची शक्यता असताना दुसरीकडे बियाणे, खते, मशागत आणि इतर शेती खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

शेतात जाऊन पंचनामे करा

शासकीय कार्यालयातील आकडेवारीवरच अवलंबून न राहता प्रशासनाने प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पाहणी करावी, अशी मागणी आमदार पठाण यांनी केली. पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष नुकसान याचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून तातडीने पंचनामे करण्यात यावेत. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

 

हेक्टरी ५० हजारांची मदत, कर्जमाफीची मागणी

 

पिकांचे नुकसान वाढत असल्याने शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार देण्याची गरज असल्याचे पठाण यांनी म्हटले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील परिस्थितीची तातडीने दखल घेऊन दुष्काळ अथवा दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यासोबतच शासनाच्या लागू निकषांनुसार विविध सवलती आणि मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार पठाण यांनी केली.

 

 

‘मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू’

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आमदार साजिद खान पठाण यांनी दिला आहे. “अकोला जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी; अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

आता कृषिमंत्र्यांच्या अकोला दौऱ्यानंतर प्रशासनाकडून पिकांची प्रत्यक्ष पाहणी, नुकसानीचे मूल्यांकन आणि शासनस्तरावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!