Home विदर्भ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाडेगावात पोलिसांचा रूट मार्च

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाडेगावात पोलिसांचा रूट मार्च

गणेश मंडळांना भेटी देत मार्गदर्शन; शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

राजेश पल्हाडे 

वाडेगाव : गणेशोत्सवाचा उत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बाळापूर पोलिसांनी वाडेगावात विशेष रूट मार्च व पेट्रोलिंग केले.

बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खाडे व पोलीस पथकाने दि. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वाडेगाव परिसरात रूट मार्च केला. यावेळी पोलिसांनी गावातील विविध गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.

पीएसआय विनोद खाडे यांनी गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर मर्यादा

गणेशोत्सवाच्या काळात डीजे व ध्वनिक्षेपकाचा आवाज निर्धारित मर्यादेत ठेवावा. वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले तसेच नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही, याची मंडळांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या.

तसेच प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेच्या मर्यादा व इतर नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांच्या रूट मार्चमुळे वाडेगावात सुरक्षेचा संदेश पोहोचला असून, गणेश मंडळांनीही पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले.

Don`t copy text!