Akola News: पाऊस कमी, पिके उद्ध्वस्त, मजुरी बंद अन् शेतमालाला भाव नाही; शेतकरी जगायचा तरी कसा?
श्रीकांत पाचकवडे
अकोला : यंदाच्या २०२६-२७ खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने अकोला जिल्ह्यातील शेतीचे अर्थचक्र अक्षरशः कोलमडले आहे. अनेक भागांत पिके करपली असून, शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन नाही, शेतमजुरांना काम नाही आणि बाजारात शेतमालाला अपेक्षित भाव नाही. त्यामुळे अकोला जिल्हा तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना तातडीचा दिलासा द्यावा, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष एम. के. दिवनाले यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे अकोला केली.
“शेतात पीक नाही, मजुराला मजुरी नाही आणि शेतमालाला भाव नाही; मग शेतकऱ्याने जगायचे तरी कसे?” असा सवाल दिवनाले यांनी उपस्थित केला. शासनाने केवळ कागदोपत्री अहवाल आणि पंचनाम्यांवर समाधान न मानता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पावसाअभावी खरीप पिके संकटात

अकोला जिल्ह्यातील अनेक भागांत अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. काही ठिकाणी उभे राहिलेले पीकही जंगली प्राण्यांकडून उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुष्काळासोबतच वन्यप्राण्यांच्या नुकसानीचे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. त्यात हवामानातील बदल आणि वादळांच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणखी बिघडले आहे.
खारपाणपट्ट्यात संकट अधिक गंभीर
जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याचे स्रोत आटत चालले असून, खारपाणपट्ट्यातील परिस्थिती विशेष चिंताजनक बनली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत असताना शासनाने तातडीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
शेतकरी आणि शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे, पाणीटंचाईवर उपाययोजना करणे, पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करणे आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे, या उपाययोजना त्वरित हाती घ्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
“शेतकरी संकटात असताना केवळ पंचनामे आणि आश्वासने देऊन प्रश्न सुटणार नाही. शासनाने आता कागदावरील कारवाई थांबवून प्रत्यक्ष मदतीचा निर्णय घ्यावा,” अशी भूमिका एम. के. दिवनाले यांनी मांडली.
मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
कृषिमंत्र्यांना निवेदन देताना अॅड. कांचन शिंदे, अॅड. प्रणव मर्के पाटील, अॅड. चंद्रकांत वानखडे, अॅड. अभय गौतम, अॅड. सुनीता गवई, अॅड. वर्षा सदार, अॅड. अमोल भोसले, अॅड. अभिषेक गौतम, सुरेश संतानी, सतीश फाटे, अॅड. दिपाली जानोरकर, अॅड. ओम मते, अॅड. चैताली बुंदेले, अॅड. वैभवी काळदाते, अॅड. आकाश गाडगे, अॅड. सायली लोंदे, हरीश परवानी, राहुल संतानी, सुदर्शन कावना, मंगेश कराळे, भूषण खारोळे, राजेंद्र काळने, दिनेश काठोके, रमेश फूकट, सनत गेडाम, रमेश पंजवानी, शरीफ शहा, जब्बार शहा यांच्यासह भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अकोला जिल्हा तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना ठोस आर्थिक मदत द्यावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.






