Home विदर्भ ‎नो हॉकर्स झोनमधील कारवाईवर आमदार साजिद खान पठाण आक्रमक; आयुक्तांकडे जाब 

‎नो हॉकर्स झोनमधील कारवाईवर आमदार साजिद खान पठाण आक्रमक; आयुक्तांकडे जाब 

‎हातगाड्या तोडण्याचा अधिकार मनपाला कुणी दिला?

‎श्रीकांत पाचकवडे 

‎अकोला : नो हॉकर्स झोनमध्ये अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास विरोध नाही; मात्र कारवाईच्या नावाखाली गोरगरिबांच्या हातगाड्या जेसीबीच्या सहाय्याने तोडून त्यांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी बुधवारी घेतली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मनपाच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत हातगाड्यांची तोडफोड आणि साहित्याचे नुकसान झाल्याच्या तक्रारीनंतर आमदार पठाण यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांसह मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची भेट घेतली.

‎

‎नो हॉकर्स झोनमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणे हा प्रशासनाचा अधिकार आहे. मात्र, एखाद्या फेरीवाल्याने नियम मोडला म्हणून त्याची उपजीविकेचे साधन असलेली हातगाडीच तोडून टाकणे, साहित्याची नासधूस करणे हा कारवाईचा योग्य मार्ग नाही, असा मुद्दा आमदार पठाण यांनी आयुक्तांसमोर उपस्थित केला.

‎

‎यावेळी मनपा विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसैन, महानगर अध्यक्ष महेंद्र गवई, नगरसेवक अब्दुल सलाम, आकाश कवडे,

‎अफसर कुरैशी, गुड्डू पठाण, मो. इलियास आझाद खान, मो. इरफान, मोईन खान, फजलू पहलवान, आर्किटेक्ट सोहेल खान, शेख अब्दुल्ला, पराग कांबळे, लाला पठाण, मो. युसुफ, मो. नवेद, तशवर पटेल, सोहेल पठाण, मंजूर अहमद, सोनू खान व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‎

‎

‎‘अतिक्रमणाला समर्थन नाही; पण अतिरेकही नको’

‎

‎फेरीवाल्यांच्या प्रश्नावर काँग्रेस अतिक्रमणाचे समर्थन करीत नाही, हे स्पष्ट करत आमदार पठाण यांनी प्रशासनाच्या कारवाईतील पद्धतीवर आक्षेप घेतला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांवर दंड आकारावा, त्यांचे साहित्य किंवा वाहन जप्त करावे आणि नियमानुसार पुढील कारवाई करावी. मात्र, जेसीबी लावून हातगाड्या तोडण्याची कारवाई करू नये, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.

‎

‎गोरगरिबांसाठी हातगाडी हा केवळ व्यवसाय नसून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याचे साधन आहे. अशा परिस्थितीत कारवाई करताना प्रशासनाने नियमांसोबतच मानवी दृष्टिकोनही ठेवणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‎

‎

‎

‎आयुक्तांचा सकारात्मक पवित्रा

‎

‎आमदार पठाण आणि काँग्रेस नगरसेवकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सकारात्मक भूमिका घेतली. यापुढे फेरीवाल्यांच्या हातगाड्यांची अशा प्रकारे तोडफोड करण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

‎

‎नो हॉकर्स झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांवर वाहन जप्त करणे आणि दंड आकारणे, अशी कारवाई करण्यात येईल. त्याचवेळी फेरीवाल्यांनीही मनपा प्रशासनाच्या नियमांचे पालन करून कारवाईस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

‎

‎

‎

‎१२ फेरीवाल्यांच्या हातगाड्या उद्ध्वस्त : काँग्रेसचा मदतीचा हात

‎

‎गेल्या दोन दिवसांत झालेल्या कारवाईदरम्यान तब्बल १२ फेरीवाल्यांच्या वाहनांचे किंवा हातगाड्यांचे नुकसान झाल्याचे यावेळी समोर आले. कारवाईत नुकसान झालेल्या या फेरीवाल्यांच्या पाठीशी उभे राहत आमदार साजिद खान पठाण यांच्याकडून पाच हजार आणि काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मिळून पाच हजार असे प्रत्येक नुकसानग्रस्त फेरीवाल्याला एकूण १० हजार रुपये रोख मदत दिली. मनपाच्या कारवाईने हातातील रोजगाराचे साधन हिरावले गेलेल्या फेरीवाल्यांना या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळाला.

‎

‎

Don`t copy text!