Home Breaking News अकोल्यात गुजरातमधून आला तब्बल १,०९७ किलो बनावट खवा! प्रशासनाच्या कारवाईने खळबळ

अकोल्यात गुजरातमधून आला तब्बल १,०९७ किलो बनावट खवा! प्रशासनाच्या कारवाईने खळबळ

 

१२.९४ लाखांचा साठा जप्त; ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतून आणि गोदामातून मोठा साठा ताब्यात

 

श्रीकांत पाचकवडे

 

अकोला : सणासुदीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात खवा-माव्याची मागणी वाढत असतानाच अकोल्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गुजरातमधून अकोल्यात आणण्यात आलेला संशयित बनावट खवा अस्वच्छ परिस्थितीत वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने तब्बल १,०९७ किलो खवा जप्त केला. या साठ्याची अंदाजे किंमत १२ लाख ९४ हजार ३०० रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

 

ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत आढळला संशयित बनावट खवा

बनावट खवा
हाच तो बनावट खवा

२४ सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अकोल्यातील निमवाडी ट्रॅव्हल्स स्टँडवर तपासणी मोहीम राबविली. यावेळी एका ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत गुजरातमधून आणण्यात आलेला संशयित खवा आढळून आला.

 

खव्याची वाहतूक अस्वच्छ वातावरणात होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने तत्काळ कारवाई करत त्याचे पाच अन्न नमुने तपासणीसाठी घेतले. संबंधित साठाही जप्त करण्यात आला.

 

सिंधी कॉलनीतील गोदामावरही छापा

 

यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिंधी कॉलनी परिसरातील एका गोदामावर कारवाई केली. या ठिकाणीही तब्बल १२० किलो संशयित खवा/मावा आढळून आला. हा साठाही प्रशासनाने ताब्यात घेतला.

 

बिलांमधून व्यापाऱ्यांची नावे समोर

 

जप्त केलेल्या खव्याबाबत प्रशासनाने अधिक चौकशी केली असता उपलब्ध बिलांच्या आधारे वैभव गणेशराव मोडक (पाटील), पियुश नागवाणी, कमल शर्मा आणि संदिप निरंकारी आदी व्यापाऱ्यांनी सदर खवा मागविल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

 

अस्वच्छ पद्धतीने वाहतूक; खवा नष्ट करण्याची प्रक्रिया

 

अस्वच्छ वातावरणात वाहतूक करण्यात आलेला हा अन्नपदार्थ मानवी आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याने जप्त केलेला खवा अकोला महानगरपालिकेच्या SWM Processing Plant, भोड येथे नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दे. गो. वीर यांनी सांगितले.

 

प्रशासनाची सणासुदीवर करडी नजर

 

ही कारवाई अमरावती विभागाचे सह आयुक्त (अन्न) एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अकोला विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. सोळंके आणि कि. ह. बोरचाटे यांनी केली.

 

सणासुदीच्या काळात बनावट, भेसळयुक्त किंवा अस्वच्छ पद्धतीने हाताळल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर प्रशासनाची नजर राहणार आहे. नागरिकांनी खवा-मावा तसेच इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद खाद्यपदार्थ आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त दे. गो. वीर यांनी केले आहे.

Don`t copy text!