बुलढाणा : जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे “बुलढाणा जिल्ह्यातील तेरा ही तालुके दुष्काळग्रस्त असताना पुन्हा पंचनाम्याचा थाट कशाला?” असा सवाल सत्याग्रह शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू नाकाडे यांनी उपस्थित केला आहे.
खरीप हंगामात पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके करपून गेली असून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
शासनाने जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचा दुष्काळसदृश परिस्थितीत समावेश केला असताना आता शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकवण्याऐवजी तातडीने ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नाकाडे यांनी केली आहे.
“शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पीक सुकले आहे. प्रशासनाला प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे कागदी प्रक्रिया आणि पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना प्रतीक्षा करायला लावू नये. शासनाने तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी,” अशी भूमिका राजू नाकाडे यांनी मांडली.
शेतकऱ्यांना केवळ दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा नको, तर प्रत्यक्ष आणि भरीव मदत मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.






