Home Breaking News जिजाऊ स्कूलच्या विद्यार्थिनींना बॅडमिंटनमध्ये जिल्हास्तरीय अजिंक्यपद

जिजाऊ स्कूलच्या विद्यार्थिनींना बॅडमिंटनमध्ये जिल्हास्तरीय अजिंक्यपद

धुन सांगवी, समृद्धी अग्रवाल व शार्वी अग्रवाल यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

 

खामगाव : बुलढाणा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या बॅडमिंटन प्रकारात आवार येथील जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. धुन सांगवी, समृद्धी अग्रवाल आणि शार्वी अग्रवाल यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत जिल्हास्तरीय अजिंक्यपद पटकावले. या यशामुळे तिन्ही विद्यार्थिनींची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या बॅडमिंटन सामन्यांमध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजच्या धुन सांगवी, समृद्धी अग्रवाल आणि शार्वी अग्रवाल यांनी सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण खेळ केला. अचूक सर्व्हिस, प्रभावी स्मॅश, वेगवान हालचाली आणि प्रतिस्पर्ध्यांच्या खेळाचा अचूक अंदाज घेत त्यांनी सामन्यांमध्ये वर्चस्व राखले. त्यांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत जिल्हास्तरावर विजेतेपद मिळविले. या विजयामुळे आता या तिन्ही खेळाडूंची अमरावती विभागीय स्तरावरील बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळातील सातत्य यामुळे त्यांनी हे यश संपादन केल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स व गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच क्रीडा मार्गदर्शकांनी त्यांचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Don`t copy text!