Home विदर्भ अकोल्याच्या विकासाला गती; क्रीडा संकुलातील जलतरण तलाव व सांस्कृतिक भवनाचे काम लवकर...

अकोल्याच्या विकासाला गती; क्रीडा संकुलातील जलतरण तलाव व सांस्कृतिक भवनाचे काम लवकर पूर्ण करा – आ. रणधीर सावरकर

आमदार रणधीर सावरकर
श्रीकांत पाचकवडे 
अकोला : अकोला शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील महायुती सरकार कटिबद्ध असून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव (स्विमिंग पूल) आणि सांस्कृतिक भवन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पाहणी करून दोन्ही कामे तातडीने पूर्ण करून ती नागरिकांसाठी खुली करण्याचे निर्देश विधिमंडळाचे मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आमदार रणधीर सावरकर यांनी आज क्रीडा संकुल परिसरात प्रत्यक्ष भेट देत जलतरण तलाव व सांस्कृतिक भवनाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. कामाच्या गुणवत्तेसह गतीही कायम ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या प्रयत्नातून जलतरण तलाव प्रकल्पासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तसेच, स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांच्या सहकार्याने सांस्कृतिक भवनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. काही कारणास्तव कामाला विलंब झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विशेष निधी मंजूर करून पुन्हा या प्रकल्पाला गती देण्यात आली.
सध्या सांस्कृतिक भवनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच अकोला जिल्ह्यातील कलाकार, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे दालन उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाहणी दौऱ्यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कामाची प्रगती समाधानकारक असल्याचे मत व्यक्त करत आ. सावरकर यांनी नागरिकांच्या अपेक्षांनुसार ही दोन्ही विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.
यावेळी पवन महल्ले, जयंत मसने, विवेक भरणे, लिखिता देशमुख, हर्षद भामरे, आरती धोगलिया, प्रशांत अवचार, योगेश मानकर, छोटू लुंगे, संदीप गावंडे, माधव मानकर, ॲड. देवाशिष काकड, ॲड. आनंद रानडे, केशव हेडा, सिद्धार्थ शर्मा, किशोर मालोकार, ॲड. सुभाषसिंग ठाकूर, डॉ. अभय जैन, सागर शेगोकार, अजय शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Don`t copy text!