श्रीकांत पाचकवडे
अकोला: अपुरा आणि अनियमित पाऊस यामुळे बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वंचित राहू नये, यासाठी शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याची ग्वाही कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांनी दिली.
“यापूर्वीही बुलढाणा जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वंचित राहू दिला नाही. यंदाही जिल्ह्यातील एकही तालुका या यादीतून वगळला जाणार नाही,” असा ठाम विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला.
पावसाअभावी शेती, पिके आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन दुष्काळी निकषांनुसार जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार व्हावा, यासाठी शासनाकडे ठोसपणे मागणी मांडली जाईल. शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांसाठीही पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी बुलढाणा जिल्ह्यातील कोणताही तालुका दुष्काळी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी भूमिका मंत्री फुंडकर यांनी यावेळी मांडली.






