Home महाराष्ट्र गणेशोत्सवाला जागतिक ओळख देण्यासाठी Bappa.org वर नोंदणी करा — पोलीस अधीक्षक...

गणेशोत्सवाला जागतिक ओळख देण्यासाठी Bappa.org वर नोंदणी करा — पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे गणेश मंडळांना आवाहन

श्रीकांत पाचकवडे

अकोला : श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी अकोला पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांची बैठक मंगळवारी (२२ सप्टेंबर) निमवाडी येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये घेण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, उपविभागीय अधिकारी जावडे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंग मोहता यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

बैठकीच्या प्रास्ताविकात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी गणेशोत्सवाची परंपरा, उत्सवाचे महत्त्व आणि बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी पोलीस मदत क्रमांकांची माहिती देत उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून १ हजारांहून अधिक व्यक्तींवर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंग मोहता यांनी गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले.

 

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करा

 

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ध्वनी प्रदूषणासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या नियम व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. गणेश मंडळे आणि भाविकांनी काय करावे, काय करू नये, याबाबतची माहिती देणारी पत्रके मंडळांसमोर लावण्यात आली असून त्याचे पालन होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

यंदाच्या गणेशोत्सवात ‘एक मंडळ, एक पोलीस अंमलदार’ ही संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाशी थेट समन्वय साधणे सुलभ होणार आहे.

 

Bappa.org वर नोंदणीचे आवाहन

 

श्री गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी अकोल्यातील गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी Bappa.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक चांडक यांनी केले.

 

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने विसर्जन घाट तसेच मिरवणूक मार्गांची पाहणी केली असून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

“गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करा. कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ ११२ क्रमांकावर माहिती द्यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे,” असे आवाहन चांडक यांनी केले.

 

बैठकीला ४८१ गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला.

Don`t copy text!