Home महाराष्ट्र अकोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला शब्द,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; भरघोस मदत...

अकोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला शब्द,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; भरघोस मदत करू!

अकोला जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी; लवकरच मदतीची अधिसूचना काढण्याचे संकेत

 

श्रीकांत पाचकवडे

 

अकोला : पावसातील दीर्घ खंड आणि कमी पर्जन्यमानामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बाळापूर तालुक्यातील दधम आणि व्याळा गावांना भेट देत पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना भरघोस मदत करण्यात येईल,” अशी ग्वाही दिली.

 

दधम, व्याळा येथे शेतात जाऊन पाहणी

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दधम येथील जी. टी. जाधव यांच्या शेतात, तर व्याळा येथील सविता वासुदेव वाशिमकर यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पावसातील प्रदीर्घ खंडामुळे तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली.

 

शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत शिंदे यांनी शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांना धीर दिला.

 

‘यंदाची दिवाळी काळी होऊ देणार नाही’

 

शेतकऱ्यांना दिलासा देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यंदाची दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना भरघोस मदत केली जाईल. याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असून, लवकरच मदतीसंदर्भात अधिसूचना काढण्यात येईल.”

 

‘शेतकरी हा जगाचा पोशिंदा’

 

पावसातील खंडामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

पाहणीवेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेतकऱ्याशी चर्चा करताना कामगार मंत्री आकाश फुंडकर

या पाहणी दौऱ्यावेळी कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार अनुप धोत्रे, आमदार संजय गायकवाड, आमदार साजिद खान पठाण,

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना आमदार साजिद खान पठाण

आमदार किरण सरनाईक, महापौर शारदा खेडकर, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार संजय रायमुलकर, महापालिका स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, भाजप नेते रणजित खेडकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Don`t copy text!