‘पंच परिवर्तन’च्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन; विद्यार्थ्यांच्या चित्रांतून सायबर सुरक्षेचा जागर
श्रीकांत पाचकवडे
अकोला : भक्तीला सामाजिक जाणिवेची जोड देत दि अकोला अर्बन बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साकारला आहे. ‘पंच परिवर्तन’ ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, नागरी कर्तव्य आणि ‘स्व’ बोधाचा संदेश उत्सवातून दिला जात आहे.
आकर्षक मंडप सजावट, संदेशमय देखावे आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमुळे मंडळाचा गणेशोत्सव नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून सायबर सुरक्षेचा संदेश
उत्सवानिमित्त अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सुरक्षा’ हा विषय असून सुरक्षित डिजिटल बँकिंग, सुरक्षित डिजिटल भारत, ऑनलाइन मित्र की धोका?, मोबाईल-इंटरनेटचा सुरक्षित वापर यांसारख्या विषयांवर चित्रे साकारता येणार आहेत.
इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर स्पर्धा होणार आहे. बंधुभाव, कुटुंब संस्कार, पर्यावरण संवर्धन, हक्कांसोबत कर्तव्य आणि स्वभाषा-स्वदेशी-स्वसंस्कृती-स्वाभिमान अशा विषयांवर विद्यार्थ्यांना कलाकृती सादर करता येतील.
प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची चित्रे २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत स्पर्धा प्रमुखांकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाळांच्या सहभागातून महाआरती
गणेशोत्सव काळात अकोल्यातील विविध नामांकित शाळांच्या सहभागातून दररोज महाआरती आयोजित करण्यात आली आहे. संस्था संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून विविध शाळांच्या प्रमुखांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे.
२२ सप्टेंबरला दोन हजार नागरिकांचे अथर्वशीर्ष
गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार आहे ते २२ सप्टेंबर रोजी होणारे सामूहिक अथर्वशीर्ष पठण. सुमारे दोन हजार महिला व पुरुष या उपक्रमात सहभागी होणार असून सामूहिक पठणातून गणरायाची भक्तिभावाने आराधना केली जाणार आहे.
भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी, संस्कार, पर्यावरण, सायबर सुरक्षा आणि नागरिकांचे कर्तव्य यांचा संदेश देणारा हा गणेशोत्सव अकोलेकरांसाठी निश्चितच वेगळा अनुभव ठरणार आहे. मंडळाच्या सर्व उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






