Home Breaking News Akola News : अकोलेकरांना ११ दिवसांनी पाणी, मग जलतरण तलावासाठी टँकरने पाणी...

Akola News : अकोलेकरांना ११ दिवसांनी पाणी, मग जलतरण तलावासाठी टँकरने पाणी कशासाठी?

 

Akola News : शहरात भीषण पाणीटंचाई असताना जलतरण तलावात टँकरने पाणी भरण्याचा प्रकार; चौकशी करून कारवाई करण्याची नगरसेवक निलेश देव यांची मागणी

 

श्रीकांत पाचकवडे | अकोला

 

अकोला शहरात एकीकडे नागरिकांना तब्बल ११ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या नवीन जलतरण तलावात उद्घाटनाच्या निमित्ताने टँकरद्वारे पाणी भरले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना जलतरण तलावासाठी टँकरने पाणी आणण्याची गरज काय? असा संतप्त सवाल उपस्थित करीत वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश रामकृष्ण देव यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

 

यासंदर्भात देव यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे संयुक्त तक्रार दाखल केली असून, संबंधित प्रकरणात कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

विकासकामांना विरोध नाही, पण पाण्याच्या वापरावर प्रश्नचिन्ह!

 

अकोला शहरात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांस्कृतिक भवन आणि जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध होत आहे. या विकासकामांचे आपण स्वागत करतो. मात्र, शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ११-११ दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना जलतरण तलावासाठी टँकरने पाणी भरणे कितपत योग्य आहे, असा सवाल निलेश देव यांनी उपस्थित केला आहे.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बांधकामासाठी एसटीपी प्रक्रियेद्वारे शुद्ध केलेले पाणी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन बोअरवेल खोदण्यावर निर्बंध घालण्यासह पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठीही उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. असे असताना जलतरण तलावासाठी पाणी नेमके कोणत्या स्रोतामधून आणण्यात आले? किती टँकर वापरण्यात आले? पाणी आणण्यासाठी परवानगी कोणी दिली? तसेच यासाठी किती खर्च करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेला द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

आदेशांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

 

या प्रकरणाची आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील लागू तरतुदींनुसार चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी भूमिका देव यांनी मांडली आहे.

Akola News

पाणीटंचाई कायम असेपर्यंत जलतरण तलावात अतिरिक्त पाणी भरणे आणि त्याचा नियमित वापर सुरू ठेवण्याबाबत प्रशासनाने परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा. तसेच पाण्याचा स्रोत, टँकरची संख्या, झालेला खर्च आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती सार्वजनिक करून संपूर्ण चौकशीचा अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

 

“विकासाला विरोध नाही, पण अकोलेकरांच्या पाण्याच्या हक्काशी तडजोड नको!”

 

“आमचा सांस्कृतिक भवन किंवा जलतरण तलावाच्या विकासकामांना विरोध नाही. अनेक वर्षांनंतर शहराला या सुविधा मिळत आहेत, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, अकोलेकरांना ११ दिवसांनी पाणी मिळत असताना जलतरण तलावासाठी टँकरने पाणी भरणे हा गंभीर विषय आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य मिळालेच पाहिजे. प्रशासनाने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी,” अशी मागणी नगरसेवक निलेश देव यांनी केली आहे.

Don`t copy text!