Home Breaking News ऑपरेशन प्रहारचा दणका! पिंजरमध्ये जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा; १४ जुगारी जेरबंद

ऑपरेशन प्रहारचा दणका! पिंजरमध्ये जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा; १४ जुगारी जेरबंद

१ लाख ४२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; सात मोबाईलसह रोख रक्कम हस्तगत

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पिंजर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. सरकारी जिनिंग परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ४२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना ग्रामीण भागातील अवैध जुगार व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथक तयार करून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

 

दरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पिंजर परिसरात गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडून सरकारी जिनिंग परिसरानजीक काही जण ५२ पत्त्यांच्या आधारे पैशांची हार-जीत लावून जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या १४ जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

 

रोख रकमेसह सात मोबाईल जप्त

 

या कारवाईत शरद पांडुरंग बुटे, रोहिदास सुरेश तुरी, पुंडलिक शंकरराव इंगळे, मोहम्मद इमरान शेख मेहबूब, अंकित संजय जयस्वाल, शुभम संजय बोडखे, जितेंद्र शांताराम राठोड, शेख रसूल शेख अलीम, लक्ष्मण बळीराम दळवी, सैयद युसूफ सय्यद मोहम्मद, सोनू किसन पवार, मोहम्मद रियाज शेख सुलतान, अनिल भीमराव माणिकराव आणि संतोष मारोती ठाकरे या १४ जणांना ताब्यात घेण्यात आले.

 

पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीतून ६१ हजार ९०० रुपये, जुगाराच्या डावावरून ४ हजार ५०० रुपये, ५२ पत्त्यांचा संच तसेच सात मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. जप्त मोबाईलची किंमत ७६ हजार रुपये असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख ४२ हजार १०० रुपये आहे.

 

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पिंजर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिल्यानंतर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एलसीबीच्या पथकाची धडक कारवाई

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, पोलीस हवालदार वसीमोद्दीन, महेंद्र मलिये, किशोर सोनवणे, मंगेश इंगळे, रविंद्र खंडारे, अन्सार शेख आणि चालक मनीष ठाकरे यांचा समावेश होता.

 

ऑपरेशन प्रहारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, पिंजर येथील या कारवाईमुळे जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Don`t copy text!