ऑपरेशन प्रहार–नार्को स्ट्राईक अंतर्गत धडक कारवाई; १ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, ४० वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
श्रीकांत पाचकवडे
अकोला : जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध अकोला पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार–नार्को स्ट्राईक अंतर्गत पिंजर पोलिसांनी महान येथे मोठी कारवाई करीत राहत्या घरातून तब्बल २ किलो ६५५ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १ लाख ३२ हजार ७०० रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पिंजर पोलीस स्टेशनचे पथक महान बीट परिसरात गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, महान (ता. बार्शिटाकळी) येथील एक इसम आपल्या राहत्या घरातून गांजाची विक्री करीत आहे.
या माहितीची खातरजमा केल्यानंतर पिंजर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी आरोपी गजानन मधुकर जांभुळकर (वय ४०, रा. महान, ता. बार्शिटाकळी) याच्या घरातील बेडरूममध्ये प्लास्टिकच्या पोत्यात ठेवलेला २.६५५ किलो ओलसर गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून १ लाख ३२ हजार ७०० रुपये किमतीचा हा गांजा जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध पिंजर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, मूर्तिजापूर वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक गजानन राठोड, पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले, पोलीस हवालदार नागसेन वानखडे, पोलीस शिपाई भागवत गांजवे, उल्हास नाईक, राजेश सावळे, महिला पोलीस कर्मचारी वैष्णवी भांडे, सुरभी मेश्राम आणि चालक होमगार्ड सूरज गावंडे यांनी सहभाग घेतला.
अंमली पदार्थ विक्रीची माहिती पोलिसांना द्या!
आपल्या परिसरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने पिंजर पोलीस स्टेशन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पिंजर पोलिसांनी केले आहे.






