Home Breaking News ऑपरेशन प्रहारची धडक कारवाई; जामवसु येथे अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांचा घाला

ऑपरेशन प्रहारची धडक कारवाई; जामवसु येथे अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांचा घाला

akola news

श्रीकांत पाचकवडे

अकोला : जिल्ह्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने बार्शीटाकळी तालुक्यातील जामवसु परिसरात मोठी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला जामवसु शिवारातील तलाव परिसरात अवैध दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता परमेश्वर शंकर तांबारे (वय 35, रा. जामवसु) हा इसम हातभट्टी दारू तयार करताना आढळून आला. पंचासमक्ष तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर मोहमाचा सडवा साठा तसेच तयार गावठी दारू आढळून आली.

कारवाईदरम्यान 330 लिटर मोहमाचा सडवा साठा आणि 30 लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण 360 लिटर माल जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची अंदाजे किंमत 55 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

जिल्हा पोलीस प्रशासनाने अवैध दारू निर्मिती, साठवणूक आणि विक्रीविरोधातील मोहीम भविष्यातही अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.

 

Don`t copy text!