श्रीकांत पाचकवडे
अकोला : सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा उत्कृष्ट आदर्श घालून देत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) स्वयंसेवकांनी रक्तदान मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित विशेष शिबिरांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल 815 युनिट रक्तसंचय करून नवा इतिहास रचला आहे.
विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या 37 महाविद्यालयांमध्ये सात दिवसांच्या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांदरम्यान रक्तदान हा प्रमुख सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील युवक-युवतींनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग
अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, वाशिम आणि गोंदिया जिल्ह्यांतील विविध कृषी, उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. काही महाविद्यालयांनी 50 पेक्षा अधिक युनिट रक्तसंचय करून विशेष कामगिरी बजावली.मारोतराव वडापाडी कृषी महाविद्यालय, यवतमाळने 64 युनिट, कृषी महाविद्यालय उमरखेडने 54 युनिट, पी.आर. पोटे कृषी महाविद्यालय, अमरावतीने 53 युनिट तर डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणाने 47 युनिट रक्तसंचय करून उल्लेखनीय योगदान दिले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे तसेच राज्य संपर्क अधिकारी डॉ. मिलिंद काळे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण
कृषी शिक्षणासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत विद्यार्थ्यांनी रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यात सहभाग नोंदविल्याने विद्यापीठाचा सामाजिक लौकिक अधिक उंचावला आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासही या अभियानामुळे मोठी मदत झाली.
कुलगुरूंची प्रतिक्रिया
“वैदर्भीय शेती शाश्वत करण्यासोबतच शेतकरी समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकीही जपली आहे. रक्तदानासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यात हिरीरीने सहभागी होत त्यांनी विद्यापीठाचा लौकिक वाढविला आहे.”
— डॉ. शरद गडाख, कुलगुरू
या रक्तदान अभियानामुळे शेकडो गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून, रा.से.यो. स्वयंसेवकांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






