श्रीकांत पाचकवडे | Akola News
अकोला : वैयक्तिक आनंदाचे क्षण समाजोपयोगी कार्यातून साजरे करण्याचा आदर्शवत उपक्रम माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे यांनी राबविला. आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सपत्निक अकोला येथील राष्ट्रसंत भय्यूजी महाराज प्रणित सुर्योदय बालगृहातील गरजू मुलांना नवीन कपड्यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.
सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आलाहोता. यावेळी बालगृहातील मुलांना नवीन कपड्यांचे वितरण करण्यात आले. नवीन कपडे मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव दिसून येत होते.
याप्रसंगी बोलताना शंकरराव इंगळे यांनी वैयक्तिक आनंद साजरा करण्याबरोबरच समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्याची भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे, असे मत व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असून सामाजिक जाणीव अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यांसारखे वैयक्तिक आनंदाचे क्षण सामाजिक कार्यातून साजरे करण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे मानवता, सामाजिक उत्तरदायित्व आणि सेवाभावाचा संदेश समाजात पोहोचला.






