Home सामाजिक अकोला कच्छी मेमन जमाततर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; शिक्षणातूनच समाजाचा विकास –...

अकोला कच्छी मेमन जमाततर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; शिक्षणातूनच समाजाचा विकास – आमदार साजिद पठाण

अकोला कच्छी मेमन जमात
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला कच्छी मेमन जमाततर्फे एसएससी (१० वी) व एचएससी (१२ वी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ मेमन टॉवर येथे भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. समाजातील मान्यवर, पालक आणि मोठ्या संख्येने समाजबांधवांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार साजिद खान पठाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर माजी उपमहापौर रफीक सिद्दीकी हे विशेष अतिथी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ मेमन जमातचे अध्यक्ष बिलालभाई ठेकिया होते. यावेळी राहत को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष मोहम्मद युनुस शेख बुधन, अकोला कच्छी मेमन जमातचे अध्यक्ष जावेद झकरिया, माजी अध्यक्ष हाजी इक्बाल विंधानी आणि हाजी रफीक गाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षणासोबत संस्कारांचीही गरज
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार साजिद खान पठाण यांनी शिक्षण हे समाज व राष्ट्र विकासाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच चांगले संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी उपमहापौर रफीक सिद्दीकी यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, सकारात्मक विचार आणि शिस्त यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, असे सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
“शिक्षण ही समाजाची खरी संपत्ती”
राहत को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष मोहम्मद युनुस शेख बुधन यांनी शिक्षणाला समाजाची खरी संपत्ती संबोधत विद्यार्थ्यांच्या यशामुळे संपूर्ण समाजाचा गौरव वाढत असल्याचे नमूद केले. परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षीय भाषणात बिलालभाई ठेकिया यांनी विदर्भ मेमन जमात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. उच्च शिक्षणासाठी आवश्यक सहकार्य आणि गरज पडल्यास आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शैक्षणिक प्रगतीसाठी जमात कटिबद्ध
अकोला कच्छी मेमन जमातचे अध्यक्ष जावेद झकरिया यांनी जमाततर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक सहकार्य करणे ही जमातची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही त्यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
समारंभात एचएससी आणि एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांचाही विशेष गौरव करण्यात आला.
याशिवाय हाफिज हम्माद मलाक यांनी “हाफिज-ए-कुरआन” ही मानाची उपाधी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सामूहिक प्रयत्नांतून यशस्वी आयोजन
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जमातचे सचिव सलीम गाजी, हाजी यासीन बचाव, हनिफ मलाक, वाहिद मुसानी, अकील घांची, समीर भुरानी, अझाज डोकडिया, सुफियान डोकडिया, हुसैन मुसानी, इम्तियाज गनोदवाला आणि असलम गाजी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच ठेकिया, विंधानी, गाजी, संडा आणि झकरिया परिवारांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देत आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावा, हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
One attachment  •  Scanned by Gmail

Don`t copy text!