Home विदर्भ अकोला दूध संघाला नवसंजीवनी देण्यासाठी आमदार हरीश पिंपळे यांचा पुढाकार

अकोला दूध संघाला नवसंजीवनी देण्यासाठी आमदार हरीश पिंपळे यांचा पुढाकार

आमदार हरीश पिंपळे
विशेष पॅकेजसाठी शासनदरबारी जोरदार पाठपुरावा; दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अनेक वर्षांपासून विविध अडचणींना सामोरे जाणाऱ्या अकोला जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांचा संघ (नोंदणी क्र. ८०६) याला नवसंजीवनी देण्यासाठी आणि जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार हरीश पिंपळे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी दूध संघाला विशेष आर्थिक पॅकेज मिळावे, अशी ठोस मागणी त्यांनी प्रशासनासमोर मांडली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत अकोला दूध संघाची सध्याची परिस्थिती, आर्थिक अडचणी, उत्पादन व विपणनातील आव्हाने तसेच संघाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
आमदार पिंपळे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या दुग्ध व्यवसायाशी संबंधित विविध योजनांचा लाभ अकोला दूध संघाला मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची भूमिका मांडली. यासोबतच संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठवून विशेष पॅकेज मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना आमदार पिंपळे म्हणाले की, “दूध उत्पादक शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अकोला दूध संघ सक्षम झाला तर हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक बळ मिळेल. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड होऊ देणार नाही. दूध संघाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहील.”
बैठकीस दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत हजारी, उपाध्यक्ष शिवा मोहाड, सदस्य नानाभाऊ भिसे, राहुल गांधी, साहेबराव जाधव, अन्सार खान, ब्रह्म पांडे, वंदनाताई आगे, व्यवस्थापक प्रभाकर नगराळे, गोविंदराव आगे, श्याम पांडे, शासकीय दूध व्यवस्थापक सोळंके, संचालक जाकिर पटेल, बंड सर, राजेश काळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाबार्ड, राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अकोला दूध संघाला पुन्हा सक्षम व स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने झालेली ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात असून, विशेष पॅकेज मंजूर झाल्यास जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला नवी चालना मिळण्यासोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्गही मोकळा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Don`t copy text!