प्रशासन हतबल, नागरिक भयभीत; एकनिष्ठा गौ सेवकांनी दाखवले धाडस
खामगाव |श्रीधर ढगे
खामगाव शहरातील नांदुरा रोड परिसरात आठ दिवसांपासून एका मुक्या नंदीला असह्य वेदना सहन कराव्या लागत होत्या. मात्र, प्रशासन आणि नागरिकांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत असताना एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे धाडसी गौसेवक सुरजभैय्या यादव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तब्बल दोन तासांच्या थरारक रेस्क्यूनंतर नंदीची सुटका करत त्याला नवजीवन दिले.
नांदुरा रोडवरील देवेंद्र हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या बंद सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या जीर्ण झालेल्या प्लॉटमध्ये टाकलेल्या कचऱ्यातील लोखंडी डबा एका बेवारस नंदीच्या समोरच्या उजव्या खुरात खोलवर अडकला होता. त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर जखम झाली होती. असह्य वेदनांमुळे नंदी बिथरला होता आणि गेल्या आठ दिवसांपासून परिसरात सैरावैरा धावत नागरिकांच्या अंगावर धावून जात होता.
नागरिक आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नंदीला पकडून मदत करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, वेदनेने आक्रमक झालेल्या नंदीवर कोणालाही नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी प्रशासनही हतबल झाले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सुरजभैय्या यादव यांनी गौसेवक गौरव कवटेकर, रोहित तायडे आणि चेतन तंबोले यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेतील नंदी पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रेस्क्यू मोहीम सुरू केली.
सलग दोन तास जीव मुठीत धरून सुरू असलेल्या या थरारक मोहिमेत सुरजभैय्या यादव यांनी दोरीच्या साहाय्याने नंदीच्या शिंगात फास टाकून त्याला नियंत्रणात आणले. अत्यंत धोकादायक परिस्थितीत त्यांनी नंदीच्या खुरात रुतून बसलेला लोखंडी डबा बाहेर काढला. त्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. श्रीराम ठोंबरे यांना बोलावून उपचार करण्यात आले.
आठ दिवसांच्या नरकयातनांनंतर वेदनामुक्त झालेला नंदी शांतपणे निघून गेला. हा संपूर्ण प्रसंग पाहणाऱ्या नागरिकांनी सुरजभैय्या यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना सुरजभैय्या यादव म्हणाले, “सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि लोखंडी वस्तू टाकल्यामुळे मुक्या जनावरांचे जीव धोक्यात येतात. मुक्या जीवांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरूक राहावे.”
या धाडसी रेस्क्यूमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सुरजभैय्या यादव यांच्या शौर्याची आणि प्राणिमात्रांविषयीच्या संवेदनशीलतेची सर्वत्र चर्चा होत आहे.





