श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या बदली प्रक्रियेनंतरही कुंभारी येथील आरोग्य उपकेंद्र आजही आरोग्य सेविकेविना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित आरोग्य सेविका रुजू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागात 19 मे 2026 रोजी प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रिया पार पडली होती. या प्रक्रियेत जिल्ह्यातील अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानुसार मूर्तिजापूर तालुक्यातील कुरणखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुंभारी उपकेंद्रासाठी एका आरोग्य सेविकेची विनंती बदली मंजूर करण्यात आली होती.
मात्र बदली आदेशाला एक महिना उलटून गेला तरी संबंधित आरोग्य सेविका अद्याप कुंभारी येथे रुजू झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, “अखेर प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, ही बदली प्रक्रिया अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत पवार यांच्या उपस्थितीत पार पडली होती. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी काढलेल्या आदेशानुसार सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना 31 मे 2026 पूर्वी नव्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक करण्यात आले होते.
आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, 31 मेपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त समजण्यात येईल व त्यासाठी स्वतंत्र आदेशाची आवश्यकता राहणार नाही. एवढेच नव्हे तर 1 जून 2026 नंतर जुन्या कार्यस्थळावरून वेतन अदा करू नये, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
तरीही कुंभारी उपकेंद्रासाठी बदली झालेली आरोग्य सेविका रुजू झाली नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागातही कुजबुज सुरू झाली असून जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, आरोग्य सेविकेच्या अनुपस्थितीचा फटका थेट गावकऱ्यांना बसत आहे. गर्भवती महिलांची तपासणी, बालकांचे लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम, आरोग्य जनजागृती आणि इतर प्राथमिक आरोग्य सेवा प्रभावित होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांचा इशारा
“प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित आरोग्य सेविकेला रुजू करावे, अन्यथा गावकऱ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा विचार करावा लागेल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
उपस्थित झालेले गंभीर प्रश्न
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन का झाले नाही?
संबंधित कर्मचारी अद्याप रुजू का झाले नाहीत?
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार का?
1 जूननंतर वेतन नियमांचे पालन झाले का?
कुंभारी उपकेंद्रातील आरोग्य सेवा सध्या कोणाच्या भरवशावर सुरू आहे?
कुंभारीतील नागरिकांना आता केवळ आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आरोग्य सेविकेच्या रुजू होण्याची प्रतीक्षा आहे. प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल कधी घेणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.





