Home विदर्भ व्हाईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या अकोला जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीकांत पाचकवडे

व्हाईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या अकोला जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीकांत पाचकवडे

श्रीकांत पाचकवडे
श्रीकांत पाचकवडे
अकोल्यातील फोरमच्या कार्यालयाचे उद्घाटन; पत्रकारहितासाठी कृतिशील लढा उभारण्याचा संदीप काळे यांचा निर्धार
अकोला : देशातील पत्रकारांची बलाढ्य संघटना म्हणून कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या अकोला जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत पाचकवडे यांची निवड करण्यात आली आहे. माहेश्वरी भवन येथे आयोजित फोरमच्या परिसंवाद बैठकीत संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक संदीपजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी फोरमचे मार्गदर्शक विनोद बोरे, रुबेन वाळके, जिल्हाध्यक्ष शंकर जोगी, अरुण मोडक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा नको, तर कृतिशील लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संदीप काळे यांनी केले. पत्रकारांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करून घेण्यासाठी संघटनेची बांधणी अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. पत्रकारितेतील विश्वासार्हता, प्रतिष्ठा आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक पत्रकाराने पत्रकारहिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अकोल्यातील फोरमच्या कार्यालयाचे उद्घाटन
यावेळी संदीप काळे यांच्या हस्ते अकोला येथील व्हाईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. बदलत्या पत्रकारितेच्या काळात पत्रकारांना सक्षम करण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया आणि बदलती माध्यमव्यवस्था यामुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. या परिस्थितीत पत्रकारांचे हक्क, समस्या आणि विविध मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम संघटनेकडून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हॉईस ऑफ मीडियाचे संघटनात्मक जाळे सध्या ८७ देशांमध्ये विस्तारले असून, डिजिटल, साप्ताहिक, पाक्षिक, वृत्तपत्र, रेडिओ आणि टीव्ही अशा विविध माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे काळे यांनी सांगितले.
“संघटना ही केवळ पद किंवा प्रतिष्ठेचे माध्यम नसून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी जबाबदारी स्वीकारण्याचे व्यासपीठ आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विनोद बोरे, जिल्हाध्यक्ष शंकर जोगी, अरुण मोडक, रुबेन वाळके, महेंद्र डोंगरे, संजय वाड, श्रीकांत पाचकवडे, सुभाष इरुलकर, रामेश्वर जाधव, बाबा निंगरे, बी. एन. राठोड, मनोहर मानकर, संदीप देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, याच महिन्यात अकोला येथे पदग्रहण सोहळा आणि कॅडर कॅम्प आयोजित करण्यात येणार असून सुमारे ५०० पदाधिकारी, पत्रकार व सदस्य सहभागी होणार आहेत. बदलत्या पत्रकारितेची आव्हाने, आधुनिक तंत्रज्ञान आणि पत्रकारहिताच्या आगामी कार्यक्रमांवर या कॅम्पमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शंकर जोगी यांनी दिली.
Don`t copy text!