Home विदर्भ नियमबाह्य बांधकामांना थारा नाही; दोषींवर कारवाई होणार!

नियमबाह्य बांधकामांना थारा नाही; दोषींवर कारवाई होणार!

 

स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांचा प्रशासनाला स्पष्ट इशारा

श्रीकांत पाचकवडे

अकोला : महापालिका हद्दीतील विकासकामे करताना नियमांचे उल्लंघन अजिबात सहन केले जाणार नाही. रस्ता, नाली, कंपाऊंड वॉल, शौचालय अथवा इतर कोणतेही बांधकाम नियमानुसार आणि दर्जेदार पद्धतीनेच झाले पाहिजे. नियमबाह्य काम आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिला.

 

दि. १० सप्टेंबर रोजी मागील वर्षातील नगरोत्थान, दलितेत्तर, दलित वस्ती, मूलभूत सोयी-सुविधा तसेच इतर निधीतून प्रस्तावित कामांचा प्रभागनिहाय आढावा घेण्यात आला. बैठकीला उपमहापौर अमोल गोगे, सभागृह नेते पवन महल्ले, नगरसेवक अमोल माहोकार व हर्षद भांबेरे उपस्थित होते.

 

५६ विकासकामे रखडली

महापालिका क्षेत्रातील ५६ विकासकामे अद्याप प्रलंबित असल्याचे आढाव्यात समोर आले. भूमिगत गटार योजनेची कामे, जागेचा अभाव आणि अतिक्रमण यामुळे काही कामांना विलंब झाला आहे. ही कामे तातडीने मार्गी लावून पूर्ण करण्याचे निर्देश अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

भूमिगत गटाराचे काम झाल्यानंतर रस्त्यावर केवळ माती टाकून काम उरकू नये. नियमानुसार मुरूम टाकून भराव व दबाई केल्यानंतरच रस्त्याचे काम करण्यात यावे. तसेच रस्त्याच्या वर भूमिगत गटाराचे पाईप दिसता कामा नयेत. याची जबाबदारी संबंधित अभियंत्यांची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

कचरा संकलन केंद्रांचे रस्तेही तातडीने

महापालिकेच्या चारही कचरा संकलन केंद्रांच्या आत-बाहेर जाण्यासाठी आवश्यक रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी प्रस्ताव तयार करून कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

 

कंत्राटदारामुळे विकासकामे रखडत असतील तर संबंधित कंत्राटदारावरही कारवाई केली जाईल, असा इशारा अग्रवाल यांनी दिला.

 

बैठकीला मनपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, उपअभियंते अनिल गावंडे, आशिष निचळ, युसुफ खान, नकुल पागृत यांच्यासह विभागातील सर्व कनिष्ठ अभियंते उपस्थित होते.

Don`t copy text!